माणगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची चोरी !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २१ जून (वार्ता.) – माणगंगा नदी पात्राजवळ असलेल्या म्हसवड, वरकुटे, वाकी, राऊतवाडी, देवापूर, शिरताव, वरकुटे-मलवडी, पुळकोटी या ओढ्यांमधून रात्रीच्या वेळी वाळूची चोरी होत आहे. (विनाअनुमती वाळू उपसा होत असतांना माण येथील महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन काय करत आहे ? याविषयी प्रशासनातील संबंधितांवर काय कारवाई करणार ? हे प्रशासनाने स्पष्ट करावे.- संपादक)

माण येथील प्रांताधिकारी, तहसीलदार वाळूमाफियांवर केवळ नावापुरतीच कारवाई करतांना दिसतात. एखाद्याने तक्रार केलीच, तर त्याला न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात येतो. गत ३ महिन्यांत विनाअनुमती वाळूचोरी, वाळूउपसा करणार्‍या ६ वाळूतस्करांना महसूल विभागाने लाखो रुपयांच्या नोटिसा पाठवल्या; मात्र तरीही वाळूची चोरी चालूच आहे. शेतकरी आणि ग्रामस्थ वाळूतस्करांच्या दहशतीखाली जीवन व्यतीत करत आहेत. माण तालुक्याजवळील सांगोला, माळशिरस, आटपाडी, जत, विटा, तासगाव, फलटण, वडूज, पुसेगाव आदी भागांतील वाळू ठेकेदार म्हसवड येथील वाळूतस्करांना हाताशी धरून सहस्रो ब्रास वाळूउपसा करत आहेत. जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर यांच्या साहाय्याने वाळूउपसा दिवसरात्र चालू आहे. (प्रशासनाने वाळूतस्करांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)