जर्मन बेकरी बाँबस्फोटातील आरोपीला किती काळ एकांतात ठेवणार ?

मुंबई उच्च न्यायालयाची नाशिक कारागृह प्रशासनाला विचारणा !

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – पुणे येथील जर्मन बेकरीमध्ये वर्ष २०१० मध्ये घडलेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी आरोपी हिमायत बेग जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला किती काळ एकांतात ठेवणार ?, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक कारागृह प्रशासनाकडे केली आहे, तसेच याविषयीची भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे. अंडासेलमधून अन्यत्र हालवण्याच्या मागणीसाठी बेग याने याचिका प्रविष्ट (दाखल) केली असून त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने उपरोक्त आदेश दिला. कारागृहात ‘अंडाकृती’ असणार्‍या कोठडीला ‘अंडासेल’ असे म्हणतात. येथील सुरक्षाव्यवस्था अत्यंत कडक असते. धोकादायक आतंकवादी आणि गुंड यांना अशा कोठडीत ठेवले जाते. येथे ते अन्य कुणाच्याही संपर्कात येत नाहीत.

१. हिमायत बेग याला गेल्या १२ वर्षांपासून अंडासेलमध्ये आहे. त्याला येथून कठोर सुरक्षा असलेल्या कक्षात हालवता येईल का ?, असा प्रश्‍नही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपिठाने विचारून कारागृह विभागाच्या महानिरीक्षकांकडून सूचना घेण्याचे आदेश दिले.

२. बेग याला ठेवण्यात आलेल्या खोलीत प्रकाश आणि हवा नाही. त्याला जेवणाच्या वेळीही बाहेर काढले जात नाही. बेग याला इतर बंदीवानांसह ठेवले जात नाही. एखाद्याला अनिश्‍चित काळासाठी असे एकाकी ठेवले जाऊ शकत नाही. बेगला इतरत्र अत्यंत सुरक्षित कक्षात हालवण्यात येईल का ? हे स्पष्ट करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिले.