Hasan Ali On Reasi Attack : पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याच्याकडून वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा निषेध !

पाकिस्तानी गोलंदाज हसन अली व त्याची इन्स्टाग्राम पोस्ट

न्यूयॉर्क – न्यूयॉर्कमध्ये चालू असलेल्या टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत ९ जून या दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना चालू असतांना जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात आतंकवाद्यांनी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी यात्रेकरूंना घेऊन जाणार्‍या बसवर आक्रमण केलेे. या आक्रमणात ९ भाविकांचा मृत्यू, तर ४१ जण घायाळ झाले होते. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट प्रसारित करून या आक्रमणाच्या निषेध केला आहे. यात त्याने ‘ऑल आईज ऑन वैष्णोदेवी’ (सर्वांचे वैष्णोदेवीकडे लक्ष) असे म्हटले आहे. पॅलेस्टाईनमधील रफाहवर इस्रायलने केलेल्या आक्रमणाच्या विरोधात सामाजिक माध्यमांवर ‘ऑल आइज ऑन रफाह’ (सर्वांचे रफाहकडे लक्ष) हा विषय सर्वाधिक चर्चिला गेला होता. मागील ५ दिवसांत भारतातही सामान्य नागरिकांकडून ‘ऑल आईज ऑन वैष्णोदेवी’ असा संदेश सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.

हसन अली याने भारतीय तरुणी सामिया हिच्याशी लग्न केले आहे. सामियानेही ‘ऑल आईज ऑन वैष्णोदेवी’ ही पोस्ट प्रसारित केले आहे. आतंकवादी आक्रमणाचा निषेध करणार्‍या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाचे सामाजिक प्रसारमाध्यमांवर कौतुक झाले आहे, तर पाकिस्तामधील काही जणांनी त्याच्या पोस्टवर संताप व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

किती भारतीय खेळाडूंनी या आक्रमणाचा निषेध केला आहे ?