मडगाव पालिकेचा कनिष्ठ कारकून निलंबित

  • तळागाळात फोफावलेला भ्रष्टाचार !

  • फेस्ताच्या फेरीतून गोळा केलेले १७ लाख ४० सहस्र रुपये पालिकेत जमाच केले नाहीत.

(फेस्त म्हणजे ख्रिस्त्यांची जत्रा)

मडगाव, १२ जून (वार्ता.) – पालिका क्षेत्रात पुरुमेंताचे फेस्त या ख्रिस्त्यांच्या जत्रेच्या फेरीत गोळा झालेले सुमारे १७ लाख ६६ सहस्र रुपये मडगाव नगरपालिकेच्या तिजोरीत भरले गेले नसल्याने पालिकेने पालिकेचा कनिष्ठ कारकून योगेश शेटकर याला सेवेतून निलंबित केले आहे. संबंधित कारकुनाने पालिकेचे पैसे त्वरित पालिकेच्या तिजोरीत जमा न केल्यास त्याच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी पालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी दिली आहे.

मडगाव पालिका क्षेत्रात हल्लीच पुरुमेंताचे फेस्त भरले होते. या फेस्तामधील फेरीवाल्यांकडून कनिष्ठ कारकून योगेश शेटकर याने पालिकेच्या वतीने शुल्क गोळा केले होते. स्थानिक नेते सावियो कुतिन्हो म्हणाले, ‘‘संबंधित कारकुनाने पैसे वसूल करतांना पालिकेचा ‘क्यू आर्’ कोड न वापरता तो स्वत:चा वापरला. अनावधानाने ही चूक झाल्याचे संबंधित कारकुनाचे म्हणणे आहे. या प्रकरणी माहिती अधिकाराखाली माहिती मागितल्यानंतर पालिकेने संबंधित कारकुनावर कारवाई केली आहे. (म्हणजे तोपर्यंत पालिकेलाही फेस्ताच्या फेरीवाल्यांकडून घेतलेले पैसे जमा झालेत का, हे ठाऊक नव्हते, असाच होतो. कारकुनाला फेरीवाल्यांकडून पैसे गोळा करायला सांगितल्यावर, त्याने ते जमा केले का नाही, हे दुसर्‍याच दिवशी तपासणारे पालिकेत कुणी नव्हते का ? पालिकेचा अशा प्रकारे भोंगळ कारभार चालू असतो का ? यातील सर्वच संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) या प्रकरणी सर्व पैसे तात्काळ वसूल न झाल्यास याविषयी उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.’’ (उच्च न्यायालयात जाण्यासाठी येणारा खर्च कोण भरणार ? स्वतः कर्तव्यचुकारपणा करून जनतेच्या पैशांतून न्यायालयात दाद मागण्यात काय अर्थ आहे ? साधा कारकून पालिकेच्या नियंत्रणात नाही, तर पालिका कसा कारभार करत असेल, ते दिसून येते ! – संपादक)