प्रतिदिन वाचा ‘भारतीय संस्कृती’ची तोंडओळख करून देणारी लेखमालिका !
‘दुसर्याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो; म्हणून ‘त्याला आवडेल’, असेच वागावे. देवाला न आवडणारे कर्म म्हणजे पाप, तर परोपकार हे पुण्यकर्म आहे, कर्तव्य पार पाडणे, हे पुण्यकर्म नाही. ते आवश्यक कर्म आहे’, या विचारांना आदर्श मानणे, सहस्रो वर्षांपासून आदर्श मानत रहाणे, हे भारतीय संस्कृतीचे लक्षण आहे.
It is better to light a candle than curse the darkness (म्हणजेच अंधार अंधार म्हणून रडत रहाण्यापेक्षा निदान एक तरी दिवा प्रथम लावावा, हे बरे) या विचाराने ‘भारतीय संस्कृती’ हे छोटेसे पुस्तक आमच्या नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची तोंडओळख व्हावी; म्हणूनच लिहून प्रकाशित करत आहोत.
लेखांक १.
पू. भारताचार्य सु.ग. शेवडे यांचा ‘भारतीय संस्कृती’ हा ग्रंथ या विषयाच्या संदर्भातील जिज्ञासेची पूर्ती करणारा असणे !
‘मला धर्म आणि संस्कृती यांबद्दल जिज्ञासा होती आणि त्यांबाबत लिखाण करावेसे वाटत होते. भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथवाचनाने माझी ही जिज्ञासा आणि ग्रंथलिखाणाची इच्छा पूर्ण झाली. ‘या ग्रंथाच्या वाचनाने बहुतेक सर्वांच्याच या विषयाच्या संदर्भातील सर्व जिज्ञासा पूर्ण होतील’, याची मला खात्री आहे; म्हणून या ग्रंथातील लिखाण ‘सनातन प्रभात’मधून क्रमशः प्रकाशित करत आहोत आणि त्यांचा हा ग्रंथही ‘सनातन संस्था’ प्रकाशित करणार आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.६.२०२४)
१. भारतीय संस्कृतीतील व्यक्तीजीवन
कुटुंबातला ‘कु’ हा कुळातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी आहे. ‘टु’ हा शब्द पती-पत्नी या दोघांसाठी आहे. संस्कृतमध्ये ‘तुङ्ग’ म्हणजे ‘prominent’ महत्त्वाचा घटक. ते हे दोघे आणि ‘ब’ म्हणजे बाळासाठी; म्हणून कुटुंब. हे या ३ पिढ्यांचे बनते. या ३ पिढ्या एकत्र असतात, ते कुटुंब.
२. विविध प्रकारची बंधने आणि प्रकार
२ अ. कौटुंबिक बंधने : कुटुंबातील घटक असणारी व्यक्ती ही कुटुंबातील प्रत्येकाशी जवळच्या नात्याने संबंधित आहे. त्यामुळे तिच्यावर काही दायित्व आहे. वृद्ध आजी-आजोबांची सेवा, हे नातवंडांचे कर्तव्य आहे. आई-वडिलांच्या आज्ञेचे आदरपूर्वक पालन करणे, हे मुलांचे कर्तव्य आहे. मुलांचे कोडकौतुक करणे, हे आई-वडिलांचे कर्तव्य आहे. पती-पत्नीने परस्परप्रेमाने; पण मर्यादेत राहून वृद्ध सेवा आणि अपत्यवात्सल्य ही दोन्ही कर्तव्ये साधायची आहेत.
प्रत्येक व्यक्ती ही कौटुंबिक बंधनाने बद्ध आहे. आपण बाहेर गेलो आणि वेळेवर आलो नाही, तर ‘घरची माणसे आपली काळजी करतील’, याचे भान आपल्याला ठेवावे लागते. आपल्या मुलांची हौस आपणच नाही पुरवायची, तर कुणी पुरवायची ? वृद्धांनाही काही अपेक्षा असतात. त्यांना तीर्थयात्रा कराव्याशा वाटतात. कधी गावातही फेरफटका मारावासा वाटतो. कधी आजारपणात त्यांचे औषधपाणी करावे लागते. त्यांच्यावर उपचार करावे लागतात. हे सर्व प्रेमाने, आदराने आणि वात्सल्याने एकमेकांसाठी करणे, हे कुटुंबातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. आपल्या कुटुंबातील अन्य घटकांना त्रास आणि दुःख होणार नाही, असे वागणे, हे प्रत्येक घटकाचे कर्तव्य असते. घरातील सणवार साजरे करण्याची, तसेच कुळधर्म आणि कुलाचार पालन करण्याची परंपरा आपण सांभाळायची असते.
प्रत्येक कुटुंबाचा आहार ठराविक स्वरूपाचा असतो. कुणी शाकाहारी, तर कुणी मांसाहारी आहेत. शाकाहारीतही सर्व काळ सगळे अन्न खाण्याची पद्धत नसते. काहींना कांदा आणि लसूण वर्ज्य असतो. उपवासाच्या दिवशीचा आहार वेगळा असतो. त्या दिवशी वापरण्याची तुपा-मिठाची भांडीसुद्धा वेगळी असतात. काही मांसाहारीसुद्धा श्रावणमासात मांसाहार करत नाहीत. कुणाला अमुक आवडते, तर कुणाला तमुक आवडत नाही. कुटुंबातील माणसांनी सर्वांच्या आवडीनिवडी आत्मीयतेने सांभाळायच्या असतात. आपण परगावी गेलो असलो, तरी चित्त घराकडे असते. आपल्याला घरच्या माणसांची काळजी असते. ‘कुणाला काही झाले’, असे कळले, तर आपण तात्काळ घरी येतो. रजा घेऊनही घरी रहातो. एकूण भारतीय व्यक्तीला कौटुंबिक बंधने पाळावीच लागतात.
२ आ. सामाजिक बंधने : प्रत्येक व्यक्ती कुटुंबाप्रमाणेच समाजाचाही एक घटक आहे. ज्या समाजात आपण रहातो, वावरतो, त्या समाजाच्या संदर्भातही आपल्यावर काही बंधने आहेत. आपला पोषाख, रहाणे, खाणे-पिणे, कौटुंबिक जीवन, वैवाहिक जीवन, आपले समाजातील स्थान आणि त्यानुसार आपली वागणूक या सर्व गोष्टी सांभाळणे, हे भारतीय मनुष्याला आवश्यक वाटते. ‘आपल्या समाजातील प्रत्येक घटकाला शोभेल असेच त्याने वागले पाहिजे’, असा आपला कटाक्ष असतो. माणसामाणसागणिक आपल्या काही अपेक्षा असतात. त्यांना सोडून कुणीही वागले, तर आपल्याला ते खटकते.
आपल्या देशात, निदान महाराष्ट्रात तरी कुंकू नसणे, हे वैधव्याचे लक्षण मानले जाते. ‘कपाळावर सौभाग्यचिन्ह असावे’, ही सामाजिक मर्यादा आहे. ती पाळणेच इष्ट. ‘जे ज्याला सामाजिक परंपरेत उचित, ते त्याने पाळणे हितावह’, असे भारतीय संस्कृती मानते. आपल्या शेजारच्या सत्तरीच्या आजीबाई काल-परवापर्यंत मंदिरात महादेवाला पाणी घालतांना दिसायच्या. त्या सौंदर्यवर्धनालयातून (ब्युटीपार्लरमधून) केस कापून ‘बॉयकट’ करून आल्या, तर कसे वाटेल ? एखादा वैदिक कर्मठ ब्राह्मण उपाहारगृहात (हॉटेलात) जाऊन मांसाहारावर ताव मारतांना दिसला, तर कसे वाटेल ? एखादी सुसंस्कृत महाराष्ट्रीय, सुशिक्षित युवती रस्त्यातून सिगारेट फुंकत जातांना दिसली तर ? पंजाबच्या राज्यपालपदी असतांना काका गाडगीळांना म्हणे रस्त्यावरची भजी खायची इच्छा झाली; पण चालकाला (ड्रायव्हरला) पटेना. काल-परवाच नवरा गेलेली विधवा नटूनथटून शॉपिंगला गेली, तर लोकांना रूचेल का ?
२ इ. कायद्याची बंधने : काही काही कामे आपण चांगली म्हणून करतो; पण ती कायद्याच्या दृष्टीने चुकीची ठरू शकतात. कायद्याने मनुष्याच्या वागणुकीचे काही नियम बनवले आहेत. त्यांचे पालन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. यालाच सरकारी किंवा राजकीय बंधन म्हणतात. एखाद्या ठिकाणी मारामारी चाललेली असते. कुणीतरी दोघे-चौघे एखाद्याला मारत असतात. आपल्याला वाटते की, आपण जाऊन सोडवावे; पण नंतर जी कायद्याची गुंतागुंत उत्पन्न होईल, तिला कुणी तोंड द्यायचे ? म्हणून मनुष्य चांगले कर्मसुद्धा करायचे टाळतो.
२ ई. धार्मिक बंधने : प्रत्येक व्यक्तीला धार्मिक बंधने असतात. भारतीय संस्कृती ही बंधने मानते. मुसलमानांनी नियमित ५ वेळा नमाज पढावा. ख्रिस्त्यांनी प्रत्येक रविवारी चर्चमध्ये जावे. हिंदूंनी घरात आपल्या देवतांची चित्रे लावावीत. आपल्या धर्माचे सणवार साजरे करावेत. ख्रिस्ती लोक वाढदिवसाला केकवर मेणबत्त्या लावून विझवतात. हिंदूंमध्ये वाढदिवस असणार्याला निरांजन लावून ओवाळायची पद्धत आहे. शैव महाशिवरात्रीचा उपवास करतात, तर एकादशीला जेवतात. वैष्णव एकादशीचा उपवास करतात, शिवरात्रीला उपवास करत नाहीत.
वर्षारंभदिनसुद्धा हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान आणि पारशी यांचा वेगळा ! मुसलमानांचे रोजे हिंदूंना पाळावे लागत नाहीत, तर रामनवमीचा रामजन्म हा हिंदूंचाच पवित्र सण आहे. होळीच्या दिवशी वर्षातून एकच दिवस हिंदू शिमगा करतात.
लग्न म्हणजे वधूवरांच्या मंगल सहजीवनाचा प्रारंभ ! ते लग्नसुद्धा हिंदूंचे, मुसलमानांचे आणि ख्रिस्त्यांचे अगदी वेगवेगळ्या प्रकारे साजरे होते. त्यांनी ते तसेच करावे, हे धार्मिक बंधन ! हिंदूंमध्येसुद्धा व्यक्ती आणि जात यांच्यानुसार धार्मिक आचारविचार भिन्न असतात. माझ्या वडिलांचे श्राद्ध मी करायलाच हवे, हे धार्मिक बंधन ! ब्राह्मणांची ‘श्रावणी’ पौर्णिमा, तर कोळ्यांची ‘नारळी’ पौर्णिमा, तशी सर्वांचीच ‘राखी’ पौर्णिमा ! एकाच दिवसाची धार्मिक कृत्ये वेगवेगळी ! उत्तरेकडे कपाळावरील कुंकवापेक्षा भांगात सिंदूर महत्त्वाचे, तर दक्षिणेकडे कुंकवाचीच पद्धत. संन्याशांचा चातुर्मास दोनच मासांचा, तर गृहस्थांचा ४ मासांचा. चातुर्मासात विवाह करू नये.
(क्रमशः)
– (पू.) भारताचार्य धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
लेखांक २. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/803582.html