नवी देहली – भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. राकेश एम्. पारीख यांच्या नेतृत्वाखाली १६ संस्थांनी केलेल्या संशोधनानुसार कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असल्यास ४० टक्के सदस्यांना वयाच्या वयाच्या ३५ वर्षांच्या आधीपासूनच मधुमेहाचा धोका उद्भवतो. देशभरातील १८ ते ८० वर्षे या वयोगटातील २ लाख २५ सहस्र ९५५ लोकांकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर केलेल्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे. याविषयीची सविस्तर माहिती विकसनशील देशांतील मधुमेहाच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये जगातील १० टक्के मधुमेही रुग्ण एकट्या भारतात होते. त्यानुसार वर्ष २०४५ पर्यंत देशातील १२ कोटी ४९ लाख लोक मधुमेहाने ग्रस्त असण्याचा अंदाज आहे.
१. या संशोधनानुसार ज्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास नव्हता, त्या कुटुंबांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना मधुमेहाचा त्रास अधिक असल्याचे दिसून आले. अहवालानुसार ३५ वर्षांखालील वयोगटातील ११.५ टक्के पुरुष आणि १२.१ टक्के महिला यांना मधुमेहाचा धोका आढळून आला.
(सौजन्य : Diabetes Par Charcha)
२. तरुणांमधील आळशी जीवनशैली आणि लठ्ठपणा हे या आजाराचे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. आहारात प्रथिनांऐवजी कार्बोहायड्रेट्स मुबलक असल्यानेही ही समस्या वाढली.