नुकतेच रोमन कॅथॉलिक पंथाने कार्लाे क्युटिस नावाच्या मुलाला ‘संत’ म्हणून घोषित केले. ‘ल्युकेमिया’ या आजाराने या मुलाचे त्याच्या वयाच्या १५ व्या वर्षीच निधन झाले. त्याच्या नावावर २ चमत्कार नोंदवले गेल्याने त्याच्या संतत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचे व्हॅटिकनच्या पोप यांनी सांगितले. कार्लाेने ख्रिस्ती पंथाचा इंटरनेटच्या माध्यमातून प्रसार करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले होते.
रोमन कॅथॉलिक लोकांच्या मते वैद्यकीय उपचारांविना एखादा रोग बरा झाला, तर तो चमत्कार मानला जातो. मॅथ्युस या ब्राझीलमधील एका मुलाचा गंभीर जन्मजात आजार म्हणे त्याने कार्लाेच्या अवशेषांना स्पर्श केल्यावर बरा झाला, तर एका मुलीचा डोक्याचा आजार कार्लाे याला प्रार्थना केल्याने बरा झाला. असे खरेच झाले असेल का ? हे देवाला आणि खर्या संतांनाच ठाऊक !
१. नेमके अंधश्रद्धावादी कोण ?
रोमन कॅथॉलिकांनी कुणाला संत म्हणावे ? कशाला चमत्कार म्हणावे ? आणि चमत्कार मानावे ? हा त्या पंथाचा अन् पंथियांचा प्रश्न ! याचे कारण याच कॅथॉलिक चर्चने १७ व्या शतकात ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’, असे सांगणार्या गॅलिलिओचा छळ केला होता; कारण तत्कालीन पोप यांच्या मते ‘पृथ्वी ही आकाशगंगेच्या मध्यभागी होती आणि अन्य ग्रह-तारे पृथ्वीभोवती फिरत होते.’ १७ व्या शतकात पोपसंस्थेचा अशा प्रकारचा दावा होता, तर त्याच्या बरेच वर्ष आधी संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसातील एका श्लोकात ‘पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये किती अंतर आहे ?’, याचा उल्लेख आहे. हे अंतर आणि आधुनिक विज्ञानाने काढलेले अंतर यांमध्ये १ टक्काही भेद नाही. थोडक्यात हिंदु संत-ऋषिमुनी अध्यात्मामध्ये (धर्मश्रद्धेमध्येही) सहज वैज्ञानिक तथ्ये सांगतात, तर अन्य पंथीय धार्मिक व्यक्ती शास्त्रज्ञांच्या शोधालाही अंधश्रद्धा मानतात. त्यामुळे नेमके अंधश्रद्धावादी कोण आहेत ? हे जनतेनेच ठरवावे.
२. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि वैशिष्ट्य
हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व अजून एका कारणाने उठून दिसते. ते म्हणजे हिंदु धर्मात संत व्हायला चमत्कार सिद्ध करावे लागत नाहीत. ‘संतत्व हे त्या व्यक्तीची नैतिकता आणि आध्यात्मिकता यांवर अवलंबून असते. संतत्व हे चाफ्याच्या फुलाप्रमाणे असते. जसा चाफ्याचा सुगंध दरवळतो, तसे व्यक्तीतील संतत्वाची इतरांना प्रचिती येते. त्यासाठी चमत्कारच करून दाखवायला हवा’, असे हिंदु धर्मात नाही. हिंदु धर्मात रेड्याच्या मुखी वेद वदवून घेणारे जसे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली आहेत, तसे अत्यंत संयमी आणि परोपकारी वृत्ती असलेले संत एकनाथ आहेत. भारतभूमीत जन्मलेल्या आणि लोकोत्तर कार्य केलेल्या संतांची कितीतरी उदाहरणे आहेत. या संतांमधील चैतन्य आज काहीशे वर्षांनंतरही कार्यरत आहे. हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
३. पुरो(अधो)गामी आणि नास्तिकतावादी संघटना यांचा ‘विवेक’ हाच का ?
या निमित्ताने प्रश्न असा पडतो की, एरव्ही संतभूमी महाराष्ट्राला पुरोगामी वगैरेंची भूमी म्हणवून घेणार्या नास्तिकतावादी संघटना संत परंपरेला नावे ठेवतात, संतांच्या संदर्भात घडलेल्या चमत्कारांना ‘अंधश्रद्धा’ ठरवतात; पण रोमन कॅथॉलिकांच्या संतपणाच्या दाव्याविषयी चकार शब्दही काढत नाहीत. हा कुठला विवेक ? जर नास्तिकतावाद्यांचा चमत्कारांना विरोध असेल, तर तो सर्व चमत्कारांना असायला हवा; पण तसे दिसत नाही. हिंदु धर्मीय खर्या संतांच्या संदर्भातील चमत्कारही खोटे मानायचे आणि अन्य पंथियांचे कुठलेही दावे श्रद्धेने श्रवण करत ऐकायचे आणि वर ‘विवेकाचा आवाज’ म्हणून दवंडी पिटायची, हाच खरे तर एक चमत्कार आहे. नास्तिकतावाद्यांच्या या चमत्कारिक भूमिकेविषयी खरे तर त्यांनी याविषयी उत्तर द्यायला हवे.
सद्यःस्थितीत जगभरात चर्च ओस पडू लागली आहेत आणि युवा वर्ग हिंदु धर्माकडे आकर्षित होऊ लागला आहे; म्हणून एखाद्या किशोरवयीन मुलाला ‘संत’ घोषित करण्याची वेळ पोप यांच्यावर आली का ? हा व्हॅटिकनच्या अभ्यासाचा विषय !
– सौ. गौरी नीलेश कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२६.५.२०२४)
संपादकीय भूमिकाहिंदु संतांच्या चमत्कारांना ‘अंधश्रद्धा’ ठरवणारे पुरो(अधो)गामी ख्रिस्त्यांच्या संतपणाच्या दाव्याविषयी काही बोलत का नाहीत ? |