Sasoon Doctors  Destroy ‘Blood Sample’ आरोपीचे ‘ब्लड सॅम्पल’ ससून रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी कचर्‍याच्या डब्यात फेकले !

  • पुणे येथील ‘पोर्शे’ कारच्या अपघात प्रकरण !

  • २ आधुनिक वैद्यांना अटक !

  • आरोपी सुरेंद्रकुमार अग्रवाल याने त्यासाठी आधुनिक वैद्यांना दिली ३ लाख रुपयांची लाच !

पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’ अपघाताच्या प्रकरणातील ‘ब्लड सँपल’ (रक्ताचे नमुने) गोळा करण्यात आले होते, ते दुसर्‍या व्यक्तीचे होते. तेच ‘ब्लड’ ‘फॉरेन्सिक लॅब’ला (आधुनिक प्रयोगशाळा) पाठवले होते. आरोपीचे ‘ब्लड सँपल’ ससून रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी घेऊन ते कचर्‍याच्या डब्यात फेकले. एका दुसर्‍या व्यक्तीचे ‘ब्लड सँपल’ घेतले आणि त्यावर आरोपीचे नाव लिहून तेच ‘फॉरेन्सिक लॅब’कडे (‘न्यायवैद्यक प्रयोगशाळे’कडे) पाठवले. त्यासाठी आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी ३ लाख रुपयांची लाच दिली होती’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ससूनचे आधुनिक वैद्य अजय तावरे यांच्या आदेशाने आरोपीचे डॉ. श्रीहरी हरलोर यांनी ‘ब्लड सँपल’ घेतले आणि ते ‘फॉरेन्सिक लॅब’मध्ये पाठवण्याऐवजी दुसर्‍याच व्यक्तीचे ‘ब्लड सँपल’ पाठवले. आम्हाला शंका असल्याने आम्ही आधीच आरोपीचे ‘ब्लड सँपल’ औंधच्या रुग्णालयाला पाठवले होते, असेही पोलीस आयुक्त म्हणाले.

‘ब्लड सँपल’ हे आरोपीचेच !

औंध येथे पाठवण्यात आलेले ‘ब्लड सँपल’ हे आरोपीचे असल्याचा अहवाल मिळाला आहे. आरोपीच्या वडिलांसोबत ते ‘ब्लड सँपल’ जुळले आहे. ‘ससून’च्या ‘ब्लड सँपल’सोबत वडिलांचे ‘ब्लड सँपल’ जुळले नाही. त्यामुळे यात फेरफार (पालट) झाल्याचा आम्हाला दिसून आले. त्यामुळे आम्ही २ आधुनिक वैद्यांना अटक केली आहे.

पब आणि रेस्टॉरंटस् बाहेरून बंद, आतून चालू !

अपघाताच्या घटनेनंतर शहरात पोलीस कारवाई वाढली आहे. पश्‍चिम भागातील बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, वाकड, भूगाव आदी भागांतील पब, रेस्टॉरंटस् बारमध्ये नियम पालन केल्याचा देखावा होत आहे. ही ठिकाणे ‘बाहेरून बंद असला, तरी आतून चालू’ असल्याचा प्रकार दिसून येत आहे. तथापि ग्राहकांनाही पोलिसांच्या कारवाईच्या भीती आहे. नेहमी गजबजलेली असणारी अशी ठिकाणे रिकामी असल्याचे दिसून आले. नियमांचे पालन न करणार्‍या पब आणि बारचालक यांच्याविरोधात कारवाई चालूच रहाणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

भारती विद्यापीठ पोलिसांकडून १२ जणांवर कारवाई !

रात्री नियमबाह्य व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील २ दिवसांमध्ये १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दारू पिऊन गाडी चालवणार्‍यांच्या विरोधात भारती विद्यापीठ वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

ससूनच्या २ आधुनिक वैद्यांना अटक !

डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर

आरोपीच्या ‘ब्लड सँपल’मध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी येथील ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुखाचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका

आधुनिक वैद्यही पैशांसाठी किती खालच्या स्तरावर गेले आहेत, हे या घटनेतून दिसून येते. सरकारने अशांची ‘डॉक्टर’ ही पदवी काढून घेऊन त्यांना कारागृहात पाठवले पाहिजे !