Bengaluru Traffic Fine Scam : बेंगळुरू : मृत वाहतूक पोलिसाच्या ओळखपत्राच्या आधारे जनतेकडून आकारला जात होता दंड !

अटक झालेले ३ जण मूळचे बंगाल राज्यातील रहिवासी !

या कार्डाचा वापर करून गुन्हे करत होते !

बेंगळुरू (कर्नाटक) – बेंगळुरू पोलिसांच्या नावाने ‘ट्रॅफिक फाईन’ (वाहतुकीचे नियम मोडल्यावरून दंड) आकारणार्‍या ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे लोक एका मृत पोलीस हवालदाराचे ओळखपत्र व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सर्वसामान्य लोकांना पाठवत असत. त्यासमवेत ‘यूपीआय आयडी’ पाठवून वाहतुकीचे नियम मोडल्याचे सांगत भ्रमणभाषद्वारेच दंड वसुली करत असत. या पार्श्‍वभूमीवर सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघे बंगालचे रहिवासी असून रंजनकुमार पोर्बी, इस्माईल अली आणि सुभीर मलिक अशी त्यांची नावे आहेत.

स्वत:च्या वडिलांच्या नावावर हा प्रकार चालू असल्याचे लक्षात येताच मृत हवालदाराच्या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

संपादकीय भूमिका

मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार लज्जास्पद आहे. यासह गुन्हेगारी कोणत्या थराला गेली आहे ?, हेसुद्धा यातून लक्षात येते. जनतेची फसवणूक होऊ नये, यासाठी पोलीस खात्याने यावर उपाययोजना काढली पाहिजे !