Pope Francis Declared Dead Boy Saint : १८ वर्षांपूर्वी मृत पावलेल्या १५ वर्षीय मुलाला पोप फ्रान्सिस यांनी ‘संत’ घोषित केले !

२ चमत्कार केल्याने संतपद बहाल !

व्हॅटिकन सिटी – लंडनमध्ये जन्मलेल्या कार्लो क्युटिस या १५ वर्षांच्या मुलाला मरणोत्तर संत घोषित करण्यात आले आहे. व्हॅटिकनच्या संतपद देणार्‍या विभागाचे प्रमुख कार्डिनल मार्सेलो सेमेरारो यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी कार्लो याला संतपद बहाल करण्याचा निर्णय घेतला. पोप यांच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

कार्लो याने २ चमत्कार केल्याचेही मान्य करण्यात आल्याने तो संतपदासाठी पात्र ठरला आहे. ‘केवळ देवच चमत्कार करतो’, अशी शिकवण रोमन कॅथॉलिक चर्चकडून दिली जाते; मात्र ‘स्वर्गात देवाबरोबर जे संत असतात आणि लोकांच्यावतीने देवाची प्रार्थना करतात, ते चमत्कार करू शकातात’, असा समज या पंथात आहे.

कोण होता कार्लो ?

कार्लो याचा जन्म ३ मे १९९१ या दिवशी लंडनमध्ये झाला होता. नंतर त्याचे वास्तव्य इटलीतील मिलानमध्ये होते. वर्ष २००६ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी रक्ताच्या कर्करोगाने त्याचे निधन झाले. कार्लो संगणकतज्ञ होता. ऑनलाईन पद्धतीने कॅथॉलिक पंथाचा प्रसार करण्यासाठी त्याने अनेक संकेतस्थळांची निर्मिती केली होती. व्हॅटिकनशी संबंधित संस्थेसाठी त्याने काम केले होते. ‘गॉड्स एन्फ्लूएन्सर’ आणि ‘इंटरनेटचा संत’ अशीही त्याची ओळख होती. कार्लो हा कॅथॉलिक चर्चचा पहिला ‘मिलेनियल संत’ ठरणार आहे. ज्या मुलांचा जन्म १९८० ते १९९० च्या दशकात झाला आहे, त्यांना ‘मिलेनियल जनरेशन’ म्हणतात.

कार्लो आणि पोप फ्रान्सिस

कार्लो याच्या चमत्कारांचे दावे !

मॅथ्यूस या ब्राझिलच्या मुलामध्ये गंभीर जन्मजात दोष होता, जो कार्लो याने बरा केला. हा चमत्कार वर्ष २०१४ मधील आहे. मॅथ्यूच्या कुटुंबाशी संबंधित एका पाद्य्राने मॅथ्यूस याला कार्लोच्या अवशेषांना स्पर्श करण्यास सांगितले, तसे केल्यानंतर मॅथ्यूस पूर्णपणे बरा झाल्याचे दिसले.

दुसरा चमत्कार कोस्टा रिका देशातील एका मुलीशी संबंधित आहे. ही मुलगी इटलीमध्ये शिकत होती. तिच्या डोक्याला झालेल्या दुखापतीतून ती बरी झाल्याची माहिती आहे. ‘इटालियन बिशप्स कॉन्फरन्स’च्या नियतकालिकानुसार, त्याच्या आईने कार्लोच्या मृतदेहासमोर प्रार्थना केली आणि एक चिठ्ठी ठेवली होती.