चीनने मालदीवला पुरवले १ सहस्र ५०० टन शुद्ध पाणी !

प्रतिकात्मक चित्र

माले (मालदीव) – चीन आता मालदीवची तहान भागवत आहे. चीनने १ सहस्र ५०० टन पाण्याची ताजी खेप मालदीवला पाठवली आहे. हे पाणी तिबेटमधील हिमनद्यांमधून आणण्यात आले आहे. पाण्याने भरलेली नौका माले येथील चीनचे राजदूत वांग लिक्सिन यांनी मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांच्याकडे सुपुर्द केली. यासंदर्भात माहिती देतांना जमीर म्हणाले की, शिजांग स्वायत्त प्रदेशातील (तिबेटचे चिनी नाव) लोकांकडून १ सहस्र ५०० टन मिनरल वॉटर मिळाल्याबद्दल कृतज्ञ आहे. याआधीही चीनने मार्चमध्ये १ सहस्र ५०० टन पाण्याची खेप पाठवली होती.

मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, या खेपीमुळे पाण्याच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या बेटावर पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होईल. झमीर यांनी केलेली ही ‘एक्स’वरील पोस्ट प्रसारित करत चीनचे राजदूत वांग लिक्सिन यांनी लिहिले की, शिजांग स्वायत्त प्रदेशातून दान केलेले ५ सहस्र १०० मीटर उंच हिमनद्यांचे ‘प्रीमियम (सर्वोत्कृष्ट) पाणी पर्वत आणि समुद्र येथून मालेपर्यंत पोचत असल्याचे पाहून पुष्कळ आनंद झाला. हे चीन आणि मालदीव यांच्या लोकांमधील सखोल मैत्री अन् तिबेटच्या लोकांचे मोठे यश प्रतिबिंबित करते.

मालदीवची बहुतेक बेटे वाळूच्या ढिगार्‍यांनी बनलेली आहेत. त्यामुळे येथे शुद्ध पाणी मिळणे दुर्मिळ आहे. भारताने आतापर्यंत नेहमीच मालदीवला पाण्याच्या संकटात साहाय्य केले आहे. वर्ष २०१४ मध्ये मालदीवमध्ये पाण्याचे भीषण संकट आले होते, त्या वेळी भारताने ‘ऑपरेशन नीर’ राबवले होते. या अंतर्गत भारताने विमाने आणि नौका यांच्या माध्यमातून २ सहस्र टन पाणी मालदीवला पोचवले होते. याव्यतिरिक्त वर्ष २००४ मध्ये आलेल्या सुनामी आणि २ वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीच्या वेळीही भारताने मालदीवला साहाय्य केले होते.

संपादकीय भूमिका

एखाद्या गरीब नि असाहाय्य देशाला स्वत:च्या कह्यात घेण्यासाठी चीन अशीच खेळी करतो. भारतापासून दूर जात असलेल्या मालदीवचा आत्मघात निकट आला आहे, हेच या प्रातिनिधिक घटनेतून लक्षात येते !