चीनधार्जिणा मालदीव भारताचे ‘रुपे कार्ड’ ही सेवा चालू करणार !

  • भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी धूर्त मालदीवची क्लुप्ती !

  • भारतीय पर्यटकांच्या संख्येत ४२ टक्के घट झाल्याचा मालदीवला मोठा फटका !

माले (मालदीव) – चीनधार्जिण्या मालदीवची भारतियांनी चांगलीच जिरवली आहे. गेल्या ४-५ महिन्यांत मालदीवला पर्यटनासाठी जाणार्‍या भारतियांच्या संख्येत तब्बल ४२ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असणार्‍या मालदीवचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मालदीवने भारताच्या ‘रुपे कार्ड’ची सेवा चालू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मालदीवचे आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री महंमद सईद यांनी सांगितले की, यामुळे मालदीवचे चलन ‘रुफिया’ सशक्त होईल. हे कार्ड केव्हा कार्यान्वित केले जाईल, याविषयी मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी दोन्ही देशांमधील संबंधांवर भर देत भारतासमवेत काम करण्याचे सुतोवाच केले. आपली अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याचे त्यांनी याआधी स्पष्टपणे सांगितले होते. पर्यटन मंत्रालयाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ४२ सहस्र ६३८ भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली; पण गेल्या वर्षी याच कालावधीत ७३ सहस्र ७८५ भारतीय पर्यटक मालदीवला गेले होते.

काय आहे ‘रुपे कार्ड’ ?

‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे ‘रुपे कार्ड’ हे ‘ग्लोबल कार्ड पेमेंट नेटवर्क’मध्ये समाविष्ट केलेले भारतातील पहिले कार्ड आहे. ‘ए.टी.एम्.’मध्ये पेमेंट करण्यासाठी, वस्तूंची (प्रत्यक्ष) खरेदी-विक्री आणि ई-कॉमर्स (ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या) संकेतस्थळांवर ते भारतात सर्वत्र स्वीकारले जाते.

संपादकीय भूमिका

चीनच्या तालावर नाचून भारताशी शत्रूत्व ओढवून घेणार्‍या मालदीवला आता भारतानेही ‘रुपे कार्ड’ सेवा चालू करण्यास विरोध करून त्याला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे !