फोंडा, गोवा येथील सौ. विद्या नलावडे यांनी आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना जाणवलेले साधनेचे महत्त्व !

‘सप्टेंबर २०२३ पासून मी माझ्या पायाच्या दुखण्यामुळे आजारी आहे. त्यामुळे मला ‘वॉकर’चा आधार घेऊन चालावे लागते. या आजारपणाच्या काळात गुरुदेवांनी मला सकारात्मक ऊर्जा देऊन स्थिर ठेवले. या कालावधीत मी अनुभवलेली गुरुकृपा, मला आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. विद्या नलावडे

१. आजारपणाच्या काळात मनात आलेले सकारात्मक विचार

अ. ‘देव प्रतिदिन माझे प्रारब्ध न्यून करत आहे. तो आपत्काळापूर्वीच माझे प्रारब्ध संपवत आहे’, असे मला वाटत होते.

आ. मला या आजारपणाच्या काळात ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव (गुरुदेव) सतत माझ्यासमवेत असून तेच मला शक्ती देत आहेत’, असे जाणवत होते.

२. कुटुंबियांनी घेतलेली काळजी

मी आजारी असतांना माझे यजमान आणि दोन मुली यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली अन् माझी चांगली सेवा केली. तेव्हा मला ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव त्यांच्या माध्यमातून माझी काळजी घेत आहेत’, असे जाणवत होते.

३. ग्रंथवाचनातून निर्माण झालेली अंतर्मुखता आणि शिकायला मिळालेली सूत्रे

या आजारपणाच्या कालावधीत मी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनमोल शिकवण, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा साधनाप्रवास, त्यांनी केलेली गुरुसेवा आणि त्यांचे शिष्यत्व’ हे ग्रंथ, तसेच सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास’ या ग्रंथांचे वाचन केले. हे ग्रंथ वाचतांना मला त्यातून साधनेविषयक पुष्कळ सूत्रे शिकायला मिळाली.

३ अ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या विषयीचे ग्रंथ

१. परात्पर गुरुदेवांच्या साधना प्रवासाच्या संदर्भातील ग्रंथ वाचत असतांना ‘गुरुदेवांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून इतरांना कसे शिकवले ?’, हे सूत्र माझ्या लक्षात आले.

२. माझे यजमान आणि मुली यांच्याकडून माझ्या पुष्कळ अपेक्षा असतात. ‘त्यांनी व्यष्टी साधनेचे प्रयत्न करावेत’, असे मला वाटायचे. या ग्रंथांच्या वाचनानंतर मी स्वतःला प्रश्न विचारला, ‘तुझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न किती होतात ?’ त्यानंतर मी प्रथम माझे व्यष्टी साधनेचे नियोजन करून प्रयत्न चालू केले आणि त्यातून मला पुष्कळ आनंद मिळाला. माझ्या इतरांकडून होणार्‍या अपेक्षाही न्यून झाल्या.

३ आ. सद्गुरु (कु.)अनुराधा वाडेकर यांच्या संदर्भातील ग्रंथ

१. या ग्रंथामधून मला ‘आपण दिवसभरातील सेवेचे नियोजन कशा प्रकारे केले पाहिजे ?’ हे शिकायला मिळाले.

२. ग्रंथातील ‘वर्ष २००३ ते २००६ या कालावधीमध्ये सद्गुरु (कु.) अनुताईंमधील स्वभावदोषांची तीव्रता किती अल्प झाली ?’ याबद्दलची सारणी वाचल्यावर मी स्वतःच्या स्वभावदोषांविषयी अभ्यास केला. मी माझ्या स्वभावदोषांची नोंद करून त्यापुढे प्रमाण लिहून एक सूची सिद्ध केली. अशा प्रकारे मी केवळ स्वभावदोषांकडे लक्ष न देता गुणवृद्धीकडेही लक्ष दिले.

या सर्व प्रक्रियेतून मला पुष्कळ आनंद मिळत होता. हे सर्व चिंतन करत असतांना ‘मी आजारी आहे किंवा मी दिवसभर घरी एकटी आहे’, हे मला जाणवतही नव्हते.

४. सातत्याने भ्रमणभाषचा वापर आणि साधना करणे यांतील जाणवलेला भेद

४ अ. ‘साधना करण्यासाठी दिवसभरातील २४ घंटे अल्प आहेत’, याची जाणीव होणे : साधनेचे प्रयत्न करतांना ‘पूर्ण दिवसही अल्प पडत आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा मला साधना करणे आणि भ्रमणभाष पहाणे यांतील पुढील भेद जाणवला.

१. व्यवहारातील लोक सातत्याने भ्रमणभाष पहात असतात, तर साधना करणार्‍यांसाठी दिवसभराचे २४ घंटे आणि वर्षाचे ३६५ दिवसही अल्प आहेत. ‘अगदी शेवटच्या श्वासापर्यंत साधनेचे प्रयत्न केले, तरीही ते अल्पच आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

२. अती प्रमाणात भ्रमणभाष बघितल्याने त्रासदायक शक्तींचे आवरण वाढते, डोळे दुखतात, डोके दुखते आणि त्रास होतो; परंतु साधनेचे प्रयत्न सातत्याने केल्यामुळे व्यक्तीला चैतन्य, ज्ञान आणि आनंद मिळतो. ‘साधनेने साक्षात् देवाला अनुभवता येते’, हे मला शिकायला मिळाले.

‘हे गुरुदेव, या आजारपणातही तुम्ही मला आनंदी आणि स्थिर ठेवलेत. हे सर्व लिखाण तुम्हीच माझ्याकडून करवून घेतलेत. यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. विद्या नलावडे, फोंडा, गोवा. (६.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक