परमेश्वराचे नाम हेच मनाच्या शुद्धीकरणाचे अत्यंत स्वस्त आणि प्रभावी साधन !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

समर्थ रामदासस्वामींनी कुणाला उपदेश केला ? तर स्वतःच्या मनालाच कारण तेथूनच सर्व समस्या, सुख-दुःख इत्यादी चालू होते. जर ते सशक्त केले, तर आपल्या पुढे कुठलीही समस्या टिकणार नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनीही सांगितले की, मनाला शुद्ध करायचे असेल, तर एकदम सोपे आहे जसे की, पात्र स्वच्छ धुण्याकरता त्यात पाणी घालून आपण त्याला हलवून शेवटी उलटे करून सर्व पाणी फेकून देतो, तसे मनाच्या उलटे केले की, नाम येते. परमेश्वराचे नाम हेच मनाच्या शुद्धीकरणाचे अत्यंत स्वस्त आणि प्रभावी साधन आहे.

महाराज म्हणतात, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली मातत चालला आहे. त्याचा घाला चुकवायचा असेल, तर नामावर विश्वास ठेवा. कुणीही काहीही सांगितले, तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की, एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरली, म्हणजे काळ काही करू शकणार नाही. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे, हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते; म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती (चिंता) नाही.’

(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक सामर्थ्य’ या फेसबुकवरून साभार)