सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी भावपूर्ण नृत्य करतांना ‘नृत्ययोग कसा साधायचा ?’, हे समजणे

‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव झाला. या ब्रह्मोत्सवाच्या वेळी मला सामूहिक नृत्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या नृत्याचा सराव करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समोर नृत्य करण्याची इच्छा पूर्ण होणे

‘ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समोर नृत्य करायचे आहे’, असा मला निरोप मिळाला. त्या वेळी मला अतिशय आनंद झाला; कारण ‘मागील २ – ३ वर्षांपासून माझ्या मनात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समोर नृत्य करायची संधी मिळावी’, असा विचार येत होता. या वेळी देवाने संधी देऊन माझी इच्छा पूर्ण केली.

२. नृत्याचा सराव करतांना साधिकांकडून ‘शिकण्याच्या स्थितीत कसे रहायचे ?’, हे शिकायला मिळणे

कु. म्रिणालिनी देवघरे

मी नृत्य करणार्‍या साधिकांना ‘पदन्यास व्यवस्थित करूया’, असे सांगितल्यावर त्या लगेच पदन्यासांमध्ये पालट करायच्या. त्यामुळे त्या साधिकांकडून मला ‘शिकण्याच्या स्थितीत कसे रहायचे ?’, हे शिकायला मिळाले. आम्ही एकमेकींना नृत्यातील त्रुटी सांगत होतो. त्या वेळी प्रत्येक साधिका ऐकण्याच्या आणि शिकण्याच्या स्थितीत असायची.

३. नृत्य पूर्ण बसवून झाल्यानंतरही नृत्यातील पालट सहजतेने स्वीकारता येणे

नृत्य पूर्ण बसवून झाल्यानंतर दायित्व असलेल्या साधिकेकडून ‘नृत्यामधे पालट करायचा आहे’, असा निरोप मिळाला. त्या वेळी देवाच्या कृपेने आम्हा सर्व साधिकांना हा पालट सहजतेने स्वीकारता आला. या प्रसंगात आम्हा सर्वांचे मन स्थिर आणि आनंदी होते.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘गोपीभाव’ ठेवून नृत्य करण्यास सांगणे आणि त्यानुसार प्रयत्न केल्यावर नृत्यातून आनंद मिळणे

नृत्य भावपूर्ण होण्यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी आम्हाला सांगितले, ‘‘गोपीभाव’ ठेवून नृत्य करा.’’ त्यानुसार आम्ही भावपूर्ण नृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्हाला नृत्यातून आणखी आनंद मिळू लागला. तसेच ‘आम्ही नृत्य करणार्‍या सर्व साधिका वेगळ्या नसून एकच आहोत’, असे आम्हाला वाटत होते. एक दिवस आमचे नृत्य भावपूर्ण होत असतांना आम्हाला चंदनाचा सुगंध आला.

५. नृत्याच्या माध्यमातून साधिका श्रीविष्णूचे दशावतार दाखवत असतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प्रत्येक अवताराला भावपूर्ण नमस्कार करणे आणि त्या वेळी ‘नृत्यात भगवंताला स्पर्श करण्याची शक्ती आहे’, याची जाणीव होणे

ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आमचे नृत्य पहाण्यासाठी आल्या होत्या. त्या आमचे नृत्य अतिशय कुतूहलाने पहात होत्या. नृत्याच्या माध्यमातून आम्ही श्रीविष्णूचे दशावतार दाखवत होतो. नृत्यातून साधिका ते दाखवत असतांना त्या प्रत्येक अवताराला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ नमस्कार करत होत्या. नृत्य पूर्ण झाल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आम्हाला म्हणाल्या, ‘‘नृत्य अतिशय सुंदर झाले आहे. बाहेर नृत्य किंवा अन्य कलेच्या माध्यमातून अनेक जण श्रीविष्णूचे दशावतार सादर करतात; पण त्या सादरीकरणात भाव असायला हवा. तुम्ही सर्वांनी अजून भावपूर्ण नृत्य करा आणि तुमचा हाच खरा ‘नृत्ययोग’ आहे.’’ त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची आणि आम्हा सर्व साधिकांची भावजागृती झाली. या प्रसंगातून मला ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा देवाप्रती किती भाव आहे’, हे अनुभवायला मिळाले. त्या वेळी मला वाटले, ‘नृत्यात भगवंताला स्पर्श करण्याची शक्ती आहे.’

६. कृतज्ञता

केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमुळेच आम्हाला नृत्यसेवा गुरुचरणी अर्पण करण्याची संधी मिळाली. या सेवेतून देवाने आमच्याकडून साधनेतील प्रयत्न करवून घेतले. त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१६.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक