पनवेल येथील श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘वर्ष २००२ मध्ये देवद, पनवेल येथील ‘सनातन संकुल’ येथे श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन (श्रीमती वासन) या घर विकत घेऊन रहायला आल्या होत्या. प्रारंभीच्या काळात त्या एका विमान आस्थापनामध्ये नोकरी करत होत्या. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःला समाजसेवेत झोकून दिले होते. त्यामुळे संकुलातील ‘रहिवासी हितवर्धक संघा’चे (सोसायटीचे) काम पहाणे, ग्रामपंचायतीमधील कामांना साहाय्य करणे, गरजूंना शाळेसाठी पैसे किंवा साहित्य देणे, आजारी असलेल्या व्यक्तींना रुग्णालयामध्ये साहाय्य करणे इत्यादी कामे त्या करत होत्या. त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन

१. घरी काम करणार्‍या व्यक्तींना प्रेमाने जोडून ठेवणे

श्री. निनाद गाडगीळ

संकुलात कुणाला काही अडचण आली, तर काही रहिवासी त्यांच्याकडे जातात. त्यांच्या घरी येणारी गृहकृत्य साहाय्यक (कामवाली), ‘प्लंबर’, ‘फिटर’ इत्यादी सर्वांना त्यांनी त्यांच्या प्रेमळ बोलण्याने जोडून ठेवले आहे. त्यामुळे पूर्वी त्यांच्याकडे काम केलेल्या व्यक्ती त्यांनी केव्हाही एखाद्या कामासाठी भ्रमणभाष केला, तरी त्या व्यक्ती त्यांच्या साहाय्यासाठी लगेच येतात.

२. सनातन संस्थेला ‘सनातन संकुला’तील घरे भाड्याने मिळण्यासाठी अनेक अटी आणि नियम सांगणे 

देवद येथील ‘सनातन संकुला’तील काही घरांचे मालक नोकरी किंवा व्यवसाय यांमुळे बाहेरगावी रहात आहेत. त्यांच्या घरांची देखभाल दुरुस्तीची कामे श्रीमती श्रीनिवासन पहात होत्या. वर्ष २०१६-१७ मध्ये सनातन संस्थेच्या वतीने मी ‘ही घरे भाड्याने मिळतील का ?’, हे विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. त्या वेळी त्यांनी होकार दिला. काही भाडेकरूंच्या संदर्भात चांगले अनुभव आले नसल्याने त्यांनी ‘त्या घरात कोणतीही सेवा करायची नाही. त्यांना विचारल्याविना संस्थेचे साहित्य घरात ठेवायचे नाही, इत्यादी नियम त्यांनी सांगितले होते.

३. सनातनच्या आश्रमातील साधकांनी घरांची व्यवस्था उत्तम ठेवल्यामुळे साधकांप्रती आदरभाव निर्माण होणे

साधकांनी घरे वापरायला प्रारंभ केल्यावर नियमितपणे घरांची स्वच्छता करून घरे व्यवस्थित ठेवली. आम्ही घरांचे भाडेही वेळच्या वेळी देत होतो. त्यामुळे घरांच्या मालकांना किंवा काळजीवाहू (केअरटेकर) म्हणून श्रीमती श्रीनिवासन यांना काहीच त्रास झाला नाही. त्यामुळे आश्रम आणि आश्रमातील साधकांच्याप्रती त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. त्यामुळे त्या म्हणायच्या, ‘‘माझ्या पश्चात् या घरांचे दायित्व आश्रमातील साधक व्यवस्थित पाहू शकतील. त्यामुळे मला आता काही चिंता नाही.’’

४. सनातन संस्थेचे कार्य चांगले असल्यामुळे ‘सनातन संस्थेलाच घर विकायचे’, असे ठरवणे

श्रीमती श्रीनिवासन यांच्या एका नातेवाइकाचे कोरोना महामारीच्या काळात निधन झाले. त्या वेळी त्यांच्या रहात्या घराची प्रक्रिया करण्यास बर्‍याच अडचणी आल्या. तेव्हा त्यांना वाटले, ‘माझ्या पश्चात् कुणी नाही. त्यामुळे नंतर नातेवाइकांमध्ये भांडणे होऊ शकतात किंवा कुणीच रहायला आले नाही आणि घराचा योग्य वापर झाला नाही, तर हे घर चांगले रहाणार नाही. या दृष्टीने ‘रहाते घर आपण हयात असतांना विकावे आणि आपण भाड्याने घर घेऊन रहावे’, असे त्यांना वाटत होते. सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात ‘सनातन संस्थेलाच हे घर द्यावे’, असे होते.

५. स्वतःचे घर सनातन संस्थेला विकतांना ‘संस्थेने घर घेतल्यास मला आनंद आहे आणि मिळालेले मूल्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रसाद आहे’, असा भाव ठेवणे

घर विक्री करण्याचे नियोजन अंतिम झाल्यावर त्यांनी मला घरी बोलावून सनातन संस्थेला घर विकण्याची इच्छा दर्शवली. त्या वेळी मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला किती किंमत अपेक्षित आहे ?’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘माझी काहीच इच्छा नाही. संस्था जेवढी किंमत देईल, तेवढेच मी घेईन. त्यापेक्षा अधिक काही मागणार नाही. ‘संस्था योग्य तो विचार करूनच मला सांगेल’, याची मला निश्चिती आहे. ‘संस्था माझे घर घेणार’, याचा मला आनंद आहे. त्यामुळे संस्था जी किंमत सांगेल, तो माझ्यासाठी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रसाद आहे.’’

६. ‘स्वतःचे घर सनातन संस्थेलाच विकले जावे’, अशी तळमळ असणे :

घराची विक्री करतांना कागदपत्रांच्या अडचणींमुळे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ३ – ४ मास लागले. ज्या वेळी ‘कागदपत्रांच्या अडचणी दूर झाल्या आहेत आणि आता आपण व्यवहार करू शकतो’, असे मी सांगितल्यावर त्यांना पुष्कळ भरून आले. त्या म्हणाल्या, ‘‘मी देवाकडे प्रार्थना करत होते, ‘व्यवहार पूर्ण होईपर्यंत मला काही होऊ देऊ नकोस. माझी प्रकृती ठीक राहू दे. जर मला काही झाले, तर संस्थेला घर मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे तू मला व्यवस्थित ठेव.’’

७. सनातन आश्रम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणे :

एकदा त्या मला म्हणाल्या, ‘‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायची संधी मिळावी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन व्हावे’, असे वाटते.’’ त्यांना रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. मी त्यांच्या समवेत गेलो होतो. गोवा येथे गेल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला गोवादर्शन करायचे आहे का ? किंवा आश्रमाच्या जवळ काही मंदिरे आहेत, ती बघायची आहेत का ?’’ त्या वेळी त्या मला म्हणाल्या, ‘‘मी आताच रामनाथी आश्रमातील मंदिरे पाहिली आहेत. त्यामुळे पुन्हा गोव्यातील मंदिरे पहायची आवश्यकता नाही. मला प.पू. डॉक्टरांचे दर्शन झाली की, मला सगळे मिळाले. इतर काहीही करायची मला आवश्यकता नाही.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आता मला जीवनात काही नको. मला सर्वकाही मिळाले. मी आता समाधानी आहे.’’

८. प्रेमभाव :

त्यांना कोणत्याही व्यक्तीचा केव्हाही भ्रमणभाष आल्यावर त्या संभाषण संपल्यानंतर नेहमी एक वाक्य म्हणतात, ‘‘देवाने तुम्हाला सुखी ठेवावे.’’ त्यांच्याकडे कुणीही आणि केव्हाही घरी गेले, तरी प्रत्येकाला काहीतरी खाऊ दिल्याविना परत पाठवत नाहीत.

९. सनातन संकुलातील घरांच्या इतर मालकांना सनातन संस्थेलाच घरे विकण्यास सांगणे :

सनातन संस्थेने सनातन संकुलातील जी घरे भाड्याने घेतली होती, त्या घराचे सर्व मालक श्रीमती श्रीनिवासन यांच्या ओळखीचे होते. त्यांनी त्या सर्वांना सांगितले, ‘‘मी आश्रमाला घर विकणार आहे. तुम्हीही आपली घरे सनातन संस्थेला द्या. आश्रम योग्य ती किंमत देईल. त्यामुळे अधिक काही विचार करू नका.’’

१०. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांनी पूर्वी केलेली पूजा आणि साधना देवापर्यंत पोचली’, असे वाटणे :

त्या प्रतिदिन पहाटे उठून नामजप करणे, प्रार्थना आणि आरती म्हणणे इत्यादी वैयक्तिक साधना करतात. रामनाथी येथे आल्यावरही त्या पहाटे उठून स्वतःच्या खोलीत वैयक्तिक साधना करत होत्या. त्या वेळी त्यांनी खोलीत सनातन कापूर जाळून त्याचा धूर खोलीत फिरवला होता. तेव्हा त्यांना खोलीतील वातावरण पुष्कळ चांगले वाटले. त्या म्हणाल्या, ‘‘सात्त्विकता किंवा चैतन्य या गोष्टी मला कळत नाहीत. मी वर्ष १९६४ मध्ये माझे गाव सोडून मुंबई येथे स्थायिक झाले. त्या वेळी माझ्या घरी साधना करतांना जसे वातावरण वाटायचे, तसे रामनाथी आश्रमात आल्यावर वाटले आणि माझी पूजा देवापर्यंत पोचली.’’

११. सनातनच्या आश्रमातील साधक आणि आश्रम यांच्याविषयी कृतज्ञताभाव :

श्रीमती श्रीनिवासन रामनाथी आश्रमात पहिल्यांदाच आल्या होत्या, तरीही त्या प्रतिदिन जेवायला बसतांना वेगवेगळ्या ठिकाणी बसत होत्या. त्या वेळी त्यांनी सर्व साधकांशी ओळख करून घेतली. आश्रमातील ४ दिवसांच्या वातावरणाने त्या अगदी भारावून गेल्या होत्या. त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. आश्रमात येण्याची संधी मिळाली; म्हणून त्यांनी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त केली.’

– श्री. निनाद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन संकुल, देवद, पनवेल. (१८.६.२०२३)