परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या वेळी साधकाने साजरा केलेला मानस जन्मोत्सव आणि प्रत्यक्ष जन्मोत्सव या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव स्वतःच्या हृदयात साजरा करण्याचे आणि त्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवायचे ठरवणे : ‘साक्षात् देव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) जेथे रहातो, त्या रामनाथी आश्रमात त्याचा जन्मोत्सव साजरा होणारच आहे; पण ‘मी माझ्या स्तरावर त्याचा जन्मोत्सव कसा साजरा करू ?’, असा प्रश्न मला पडला. तेव्हा देवाने सुचवले, ‘हा जन्मोत्सव तू तुझ्या हृदयात साजरा कर.’

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना जन्मोत्सवासाठी माझ्या हृदयात विराजमान करायचे आहे. त्यामुळे ‘मी माझ्या मनाची स्वच्छता करायला हवी’, असे मला वाटले. त्यासाठी मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे अन् कठोरपणे राबवायचे ठरवले.

२. परात्पर गुरु डॉक्टरांचा मानस जन्मोत्सव साजरा करतांना जाणवलेली सूत्रे

२ अ. ध्यान लागणे, देह प्रकाशमान झाल्याचे जाणवणे आणि स्वतःच्या हृदयात आसनस्थ होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना आर्ततेने प्रार्थना करणे : १३.५.२०२० या दिवशी सकाळी उठल्यावर माझे मन परात्पर गुरु डॉक्टरांचा मानस जन्मोत्सव साजरा करू लागले. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर लगेच माझे ध्यान लागल्यासारखे झाले. त्या वेळी मला शंख, घंटा आणि दैवी मंत्र यांचे ध्वनी दुरून ऐकू येऊ लागले. ‘माझ्या देहातील कानाकोपर्‍यातील अंधकार दूर होऊन संपूर्ण देह प्रकाशमान झाला आहे’, असे मला दिसले. मी लोटांगण घालून परात्पर गुरु डॉक्टरांना आळवायला लागलो, ‘देवा, आता तरी या ना ! माझ्या हृदयात आसनस्थ व्हा.’ त्या वेळी ‘माझी आतडी पिळवटून निघत आहेत आणि मी पुष्कळ आर्ततेने परात्पर गुरुदेवांना हाका मारत आहेत. त्यांचा धावा करत आहे’, असे मला जाणवले.

२ आ. मनरूपी कुरुक्षेत्रावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या विराट रूपाचे दर्शन होणे : प्रार्थना केल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर चैतन्याचा एक बिंदू होऊन हृदयसिंहासनावर आसनस्थ होण्यासाठी येत आहेत’, असे मला जाणवले. तो बिंदू हृदयसिंहासनावर स्थिरावला आणि माझा संपूर्ण देह तेजस्वी प्रकाशकिरणांनी उजळून निघाला. हळूहळू तो प्रकाश विरळ होत गेला आणि सहस्रो देवता समोर दिसायला लागल्या. त्या सहस्रो देवतांच्या मध्यभागी परात्पर गुरु डॉक्टर उभे होते. ज्याप्रमाणे अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने विराट रूपात दर्शन दिले, त्याचप्रमाणे या मनरूपी कुरुक्षेत्रावर परात्पर गुरु डॉक्टरांनी मला विराट रूपात दर्शन दिले. ते पाहून माझे डोळे दिपून गेले.

३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राची स्थुलातून पूजा करतांना जाणवलेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

३ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ मी पूजनासाठी ठेवला होता. ‘परात्पर गुरु डॉक्टर पूजनातील प्रत्येक कृतीचा स्वीकार स्थुलातून करत आहेत’, असे मला जाणवले.

३ आ. साधकाला फुलांची विशिष्ट मांडणी सुचवण्याविषयी देवाने सूक्ष्मातून सांगितलेले कारण : देवाने सुचवल्याप्रमाणे मी ग्रंथाच्या समोर फुलांची मांडणी केली गेली. त्या मांडणीमध्ये माझ्याकडून ३ फुले समोर आणि त्यांच्या भोवती तुळशीची ५ पाने अर्धगोलाकार ठेवली गेली.

फुलांची मांडणी

फुलांच्या मांडणीविषयी सूक्ष्मातून देव मला म्हणाला, ‘ही तीन फुले, म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश आहेत अन् ब्रह्मा, विष्णु आणि महेश, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर आहेत. तीन फुलांच्या बाजूला अर्धगोलाकार मांडलेली तुळशीची ५ पाने, म्हणजे पंचमहाभूते आहेत. ‘पंचमहाभूतांचे स्वामी परात्पर गुरु डॉक्टर आहेत’, हे तुझ्या हृदयावर कोरले जावे; म्हणून मी तुला ती रचना सुचवली.

श्री. प्रसाद वडके

३ इ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राचे पूजन झाल्यावर त्यांच्या चेहर्‍यात पालट झाले आहेत. ते छायाचित्र जिवंत झाले आहे’, असे मला जाणवले.

४. १५.५.२०२० या दिवशी झालेल्या भावसोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे

४ अ. भावसोहळ्याची वेळ जवळ येऊ लागल्यावर वातावरणातील दमटपणा जाऊन गारवा निर्माण होणे : सकाळपासून वातावरणात दमटपणा होता आणि वारा वहात नसल्याने अंगातून घामाच्या धारा वहात होत्या; परंतु जसजशी भावसोहळ्याची वेळ जवळ येत होती, तसतसे वातावरणात पालट होऊ लागले. वारा वाहू लागला आणि आणि वातावरणात गारवा जाणवू लागला.

४ आ. भावार्चनेत सांगितलेल्या कृती देवाने आधीच करून घेतल्या असल्याचे जाणवणे : सोहळ्यात एका साधिकेने भावार्चना सांगितली. तेव्हा ‘त्यांतील ६० टक्के कृती देवाने १३.५.२०२० या दिवशीच माझ्याकडून करून घेतल्या होत्या’, हे लक्षात येऊन कृतज्ञतेने माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.

४ इ. नियतकालिक ‘सनातन प्रभात’विषयी माहिती देणारे चलचित्र पहातांना त्यातील परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून साधकाला जाणवलेले सूत्र : सोहळ्यात नियतकालिक ‘सनातन प्रभात’विषयी माहिती देणारे चलचित्र दाखवण्यात आले. त्यात आरंभी परात्पर गुरु डॉक्टरांचे दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांनाचे छायाचित्र होते. तेव्हा मला जाणवले, ‘ज्याप्रमाणे व्यासऋषींनी श्री गणेशाकडून ग्रंथलिखाण करून घेतले, त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर साधकांकडून दैनिकाची सेवा करून घेत आहेत. त्यांच्या संकल्पाने दैनिक ‘सनातन प्रभात’लाही ग्रंथाप्रमाणे चैतन्य प्राप्त झाले आहे.’

४ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी कळसाला स्पर्श केल्याचे पाहून ‘ते जगातील सर्व मंदिरांवर असलेल्या कळसांना स्पर्श करत आहेत’, असे जाणवणे : या सोहळ्यात दाखवण्यात आलेल्या एका चलचित्रात परात्पर गुरु डॉक्टर रामनाथी आश्रमावर स्थापन करण्यात येणार्‍या कळसाला स्पर्श करत होते. ते पाहून मला जाणवले, ‘ते जगातील सर्व मंदिरांवर असलेल्या कळसांना स्पर्श करत असून त्यामुळे त्या कळसांतील चैतन्यात कित्येक पटींनी वाढ झाली आहे आणि ते सगळे कळस त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.’

४ उ. ‘श्रीकृष्णाच्या आज्ञेने हनुमान रामनाथी आश्रमाच्या कळसस्थानी ध्वजावर आसनस्थ झाला असून तो साधकांचे रक्षण करत आहे’, असे जाणवणे : ‘रामनाथी आश्रमाच्या कळसावर हनुमान ध्वज आहे’, असे चित्रीकरणामध्ये दाखवत होते. तेव्हा मला आठवले, ‘हनुमंत चिरंजीव आहे. रामराज्यात हनुमंत श्रीरामाचा दास होता. जेव्हा हनुमानाचा अंतिम क्षण आला, तेव्हा हनुमंताने श्रीरामाला सांगितले, ‘‘भगवंता, तुमच्या पुढच्या अवतारात मला तुमची सेवा करायची आहे.’’ तेव्हा श्रीरामाने हनुमंताला कृष्णावतारात कृष्णार्जुन रथावरील ध्वजावर आसनस्थ होण्याची सेवा दिली.’

त्यानंतर मला जाणवले, ‘कृष्णावतार संपतांना हनुमंताने श्रीकृष्णाला विचारले, ‘भगवंता, आता पुढच्या अवतारात मला काय सेवा असेल ?’ तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ‘कलियुगात जयंत अवतार होणार आहे. तू कलियुगातील वैकुंठस्वरूप अशा रामनाथी आश्रमाच्या कळसस्थानी ध्वजावर आसनस्थ हो.’ श्रीकृष्णाने कलियुगात सनातनचे आश्रम आणि साधक यांच्या रक्षणाचे दायित्व हनुमंताला दिले. त्यामुळे इतकी संकटे येऊनही साधकांच्या केसालाही धक्का लागलेला नाही.

४ ऊ. ‘साधक साधनेत टिकून रहावेत’, यासाठी शिवदशेतून जीवदशेत येऊन साधकांवर कृपावर्षाव करणारे परात्पर गुरु डॉक्टर ! : भावसोहळा संपल्यावर मला वाटले, ‘परिस्थितीने अतिभयंकर रूप धारण केले आहे. साधकांचा साधनारूपी वृक्ष उन्मळून पडू नये; म्हणून साधकांना अष्टांगसाधना करायला सांगून त्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करत आहेत. साधक साधनेत टिकून रहावेत; म्हणून ते अखंड प्रयत्न करत आहेत. केवळ साधकांसाठी ते शिवदशेतून जीवदशेत आले आहेत आणि त्यांनी साधकांना आपल्या अखंड कृपेच्या छायाछत्राखाली ठेवले आहे.’

‘हे श्रीमन्नारायण स्वरूप गुरुदेवा, ‘मला तुमच्या कृपेच्या वर्षावात अखंड रहाता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी शरणागतीने प्रार्थना आहे.’

– श्री. प्रसाद वडके, डोंबिवली पूर्व, जिल्हा ठाणे.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक