तेल अविव (इस्रायल) – दक्षिण गाझामधील रफाह शहरात झालेल्या गोळीबारात संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षासेवा समन्वयक कर्नल वैभव अनिल काळे यांचा मृत्यू झाला असून अन्य एक सैनिक जवान घायाळ झाला. कर्नल वैभव काळे हे भारतीय नागरिक असून ते भारतीय सैन्यदलातील निवृत्त कर्नल असल्याचे समजते. त्यांनी वर्ष २०२२ मध्ये भारतीय सैन्यदलातून मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती.
संयुक्त राष्ट्रांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ४६ वर्षीय वैभव अनिल काळे हे एक महिन्यापूर्वीच गाझा येथील ‘युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटी’मध्ये सुरक्षासेवा समन्वयक म्हणून रुजू झाले होते. कर्नल अनिल काळे हे त्यांच्या सहकार्यासह वाहनातून रफाह येथील युरोपीयन रुग्णालयात जात असतांना त्यांच्यावर आक्रमण झाले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचार्यांवर झालेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध केला आहे. कर्नल अनिल काळे हे गाझामध्ये गोळीबारात मृत्यूमुखी पडलेले संयुक्त राष्ट्रांचे पहिले कर्मचारी आहेत.