विवाह विधींचे महत्त्व !

‘हिंदु विवाहामध्ये आवश्यक विधी झाले नाहीत, तर तो विवाह ग्राह्य धरता येणार नाही’, असा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने एका सुनावणीच्या वेळी दिला. सर्वाेच्च न्यायालयाने या वेळी असेही म्हटले, ‘हिंदु विवाहामध्ये सप्तपदीसारख्या सर्वच विधींना अतिशय महत्त्व आहे. विवाह म्हणजे नाच-गाणे, जेवण, मद्य पिणे, हुंड्यासह अन्य वस्तूंची देवाण-घेवाण करणे एवढेच नाही. तो एक पवित्र सोहळा आहे. यामुळे स्त्री आणि पुरुष यांना पती-पत्नी असा दर्जा प्राप्त होतो.’

विवाह असे म्हणतांना खरे तर ‘विवाह विधी’ असे बर्‍याचदा म्हटले जाते; कारण १६ संस्कारांपैकी एक असणारा हा संस्कार अनेक विधींनी युक्त आहे. थोड्या फार फरकाने देशभर विविध राज्यांत विवाहाचे विधी बहुतांश सारखेच आहेत. त्यात प्रामुख्याने काही विधी हे सामायिक आहेत; त्यांपैकी सप्तपदी, कन्यादान आदी विधी होत; कारण ते वेदकालापासून आहेत. हे विधी संस्कृतीची राष्ट्रीय व्यापकताही दर्शवतात. आता विवाहाचे स्वरूप संस्कार किंवा विधी न्यून आणि समारंभ किंवा सोहळा याकडेच अधिक झुकल्याने या विधींचे महत्त्व न्यून झाले आहे.

विधींच्या वेळी होणारे मंत्रोच्चार आणि कृती यांमुळे निर्माण झालेल्या संस्काराचे महत्त्व समजून घेतले जात नाही. काही वेळा पुरोहित मंत्रोच्चारांचे अर्थ परिपूर्ण सांगत नाहीत किंवा सांगूनही ते समजून घेण्याची अंतर्मुखता समाजात राहिलेली नाही. त्यामुळे विधी उरकणे आणि त्यासह पोषाख, रंगभूषा (मेकअप), केशभूषा, आजूबाजूची सजावट, त्यानंतरचा स्वागत समारंभ आदींकडे अधिक लक्ष असते. हे सर्व विवाहाच्या विधींचे महत्त्व लक्षात न घेतल्यानेच असे होते. ‘प्रीवेडिंग फोटोशूट’ (विवाहापूर्वीची छायाचित्रे आणि चित्रीकरण), विवाह विधींमध्ये विधींपेक्षा ‘फोटोग्राफी’ला (छायाचित्र काढणे) अधिक महत्त्व दिले जाणे, हा सर्व भाग पुष्कळ वाढला आहे. सध्या विवाह विधींच्या व्यतिरिक्त अन्यही छोटे-मोठे कार्यक्रम त्यामध्ये होत असतात. त्यामध्ये संगीत, वधू-वरांचे आगमन वेगवेगळ्या पद्धतीने व्यासपिठावर करणे आदी गोष्टींना प्राधान्य दिले जाते. विविध विधींना सर्व नातेवाइकांनी एका विशिष्ट रंगाचे पेहराव घालणे, अशीही एक पद्धतच चालू झाली आहे. या सगळ्यात विधींचे महत्त्व आपोआप न्यून होते. विवाह या अतिशय महत्त्वाच्या संस्काराला चढलेला ‘इव्हेंट’(समारंभा)चा रंग, ‘लग्न काय एकदाच होते, मजा करू देत’ अशा प्रकारची हिंदूंची असलेली अयोग्य मानसिकता यामुळेही विवाह विधींचे महत्त्व लोपते. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाला ‘विवाहाचे महत्त्व आणि तो कशा पद्धतीने करू नये ?’, हे सांगावे लागणे, ही हिंदूंसाठी लाजिरवाणीच गोष्ट धर्मशिक्षणाची आवश्यकता अधोरेखित करते.

– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी