पतियाळा (पंजाब) येथील केंद्रीय कारागृहातून हलवली जात होती सूत्रे !
नवी देहली – जगातील ५ देशांमध्ये रहाणार्या ५ खलिस्तानी आतंकवाद्यांच्या भारताच्या विरोधातील कटाची माहिती भारताच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या आतंकवाद्यांनी ‘एक्सप्लोर खलिस्तान’ ही योजना बनवली असून पंजाबच्या पतियाळा येथील केंद्रीय कारागृहातून त्याची सूत्रे हलवली जात आहेत. गुप्तचर यंत्रणाच्या माहितीनंतर गृहमंत्रालयाने या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) सोपवले आहे.
१. संयुक्त अरब अमिरातीत वास्तव्यास असलेल्या मूळच्या पंजाबच्या भटिंडा येथील मौर कला गावचा रहिवासी बलजितसिंह उपाख्य बलजित मौर, आस्ट्रेलियात वास्तव्यास असलेला गुरजंट सिंह उपाख्य जंटा, कॅनडामधील प्रिन्स चौहान, अमेरिका स्थित अमन पुरेवाल आणि पाकिस्तात लपून बसलेला बिलाल मानशेर यांनी हे कारस्थान रचले आहे.
२. हे पाचही जण खलिस्तान टायगर फोर्स (के.टी.एफ्.) या खलिस्तानी आतंकवादी संघटनेशी संबंधित आहेत. त्यांनी पतियाळा कारागृहात शिक्षा भोगत असलेला खलिस्तानी आतंकवादी कमलजित शर्मा याच्याशी संपर्क साधला. त्याला पंजाबमध्ये खलिस्तानी जाळे भक्कम करून शस्त्रास्त्रांची तस्करी आणि आतंकवादी कारवायांसाठी पैसा गोळा करण्याचे दायित्व सोपवले आहे.
३. कमलजित नव्याने भरती झालेल्या आतंकवाद्यांकडूनही काम करून घेत आहे. अलीकडेच एन्.आय.ए.ने कमलजित याची कारागृहात चौकशी केली.
४. पंजाबहून हवालाद्वारे संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि पाकिस्तान येथे कोट्यवधी रुपये पाठवले जात आहेत. चौकशीमध्ये हवाला मार्गे हा पैसा नेमका कुणाला मिळत आहे, हे समजले. पंजाबमधून ५ देशांत पाठवला जाणारा पैसा खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित विविध आतंकवाद्यांकडे पोचतो. अधिक अन्वेषण केल्यानंतर हे कोट्यवधी रुपये पंजाबच्या पतियाळा शहरातूनच इतर देशांत पाठवले जात असल्याचे उघड झाले.
संपादकीय भूमिकाखलिस्तानी आतंकवाद भारताच्या मुळावर उठल्याने तो नष्ट करणे का आवश्यक आहे, हे या घटनांवरून दिसून येते ! |