Cyber Criminals Phone Blocked:केंद्रशासनाने सायबर गुन्हा करणार्‍यांचे २८ सहस्र २०० भ्रमणभाष संच केले ‘ब्लॉक’ !

या भ्रमणभाष संचांचा वापर केलेल्या तब्बल २० लाख ‘सिम कार्ड्स’ची पडताळणी चालू !

नवी देहली – सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार दूरसंचार विभागाने २८ सहस्र २०० भ्रमणभाष संचांना ‘ब्लॉक’ (बंद) केले आहे. यासमवेतच या संचांचा वापर केलेल्या २० लाखांहून अधिक भ्रमणभाष क्रमांकांची (‘सिम कार्ड्स’ची) पुन्हा पडताळणी करण्यास सांगितले आहे. त्यांची फेरपडताळणी न केल्यास त्यांना बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

दूरसंचार विभाग, गृहमंत्रालय आणि राज्य पोलीस सायबर विभाग हे आर्थिक फसवणुकीमध्ये दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. या सामुहिक प्रयत्नाचा उद्देश फसवणूक करणार्‍यांचे नेटवर्क नष्ट करणे आणि नागरिकांना डिजिटल धोक्यांपासून संरक्षण देणे, हे आहे.

केंद्रशासनाने ६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी लोकसभेत अधिकृतपणे माहिती दिली होती की, एकट्या वर्ष २०२३ मध्ये सायबर फसवणुकीची एकूण ११.२८ लाख प्रकरणे नोंदवली गेली होती. संपूर्ण देशात सर्वाधिक प्रकरणे उत्तरप्रदेशात नोंदवण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. देशातील एकूण ११.२८ लाख सायबर गुन्ह्यांमध्ये ७ सहस्र ४८८.६ कोटी रुपयांची लूट झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ९९०.७ कोटी रुपये लुटण्यात आले, तर तेलंगाणात ७५९.१ कोटी रुपये आणि उत्तरप्रदेशात ७२१.१ कोटी रुपयांची फसवणूक झाली.