अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

अक्षय्य तृतीया ही सत्कार्याचे अक्षय्य फळ देणारी असते ! या दिवशी केलेले सर्व सत्कर्म अविनाशी होते !

अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं ।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।

उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यैः ।
तत् च अक्षयं भवति भारत सर्वमेव ॥ – मदनरत्न

अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान अन् हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)

अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुण लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते. – ईश्वर (सुश्री (कु.) मधुरा भोसले यांच्या माध्यमातून)

 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भावपूर्ण विधी केल्याने शरिराभोवती असलेले १ फूट काळे (त्रासदायक शक्तीचे) आवरण उणावणे !

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करावयाच्या विधीची मी सर्व सिद्धता केली. विधीतील सर्व साहित्याला प्रार्थना केली. विधी झाल्यावर काही वेळाने माझ्या शरिरावरील १ फूट असलेले काळे (त्रासदायक शक्तीचे) आवरण उणावल्याचे (अल्प झाल्याचे) जाणवले आणि हलके वाटले. यातून मला ‘कोणतीही कृती भावपूर्ण केल्यास अनुभूती येतात’, हे शिकायला मिळाले.

– श्री. नरेंद्र नारायण सांगावरकर, निपाणी, बेळगाव.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील निरांजनातील तूप संपले असतांनाही निरांजन एक घंटा अधिक वेळ तेवत रहाणे !

‘७.५.२०१९ या दिवशी अक्षय्य तृतीया होती. त्या दिवशी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवपूजा करण्याची सेवा मिळाली होती. त्या दिवशी मी लावलेले निरांजन अडीच घंटे तेवत होते. एरव्ही हे निरांजन एक ते दीड घंटा तेवत असते. त्या दिवशी ‘निरांजनातील तूप संपलेले असतांनाही ते अधिक वेळ तेवत होते’, हे मला परात्पर गुरु डॉक्टरांनी दाखवले.’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.५.२०१९)


अक्षय्य तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ का ?

अक्षय्य तृतीयेला साडेतीन मुहुर्तांतील एक मुहुर्त का म्हणतात ?

त्रेतायुगाला आरंभ झालेला दिवस, म्हणजे अक्षय्य तृतीया. ज्या दिवशी एका युगाचा अंत होऊन दुसर्‍या युगाला आरंभ होतो, त्या दिवसाला हिंदु धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्‍या युगाच्या सत्ययुगाचा आरंभ, अशी ‘संधी’ साधलेली असल्यामुळे त्या संपूर्ण दिवसाला ‘मुहुर्त’ म्हणतात.

मुहुर्त फक्त एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच अक्षय्य तृतीया या दिवसाला ‘साडेतीन मुहुर्तांतील एक मुहुर्त’ मानले जाते.

अक्षय्य तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. यावरून अक्षय्य तृतीया तिथीचे महत्त्व लक्षात येते. – ब्रह्मतत्त्व


अक्षय्य तृतीया तिथीचे महत्त्व !

१. भारतीय पंचांगातील तिथीचा लोप होणे किंवा वाढणे एक सामान्य गोष्ट आहे; परंतु ही तिथी स्थिर (स्थायी) आहे. तिचा कधीही लोप होत नाही. ही तिथी सर्व प्रकारच्या मंगल आणि पुण्य कार्यासाठी अतिशय शुभ मानली जाते.

२. ही तिथी विवाहासाठी अत्यंत शुभ मानली जाते; म्हणून या दिवशी एकत्रित (सामूहिक) विवाह केले जातात.

३. या दिवशी केलेल्या कृतींचा क्षय न होता त्या वाढत असल्याने सोने, चांदी इत्यादी किमती वस्तू विकत घेतल्या जातात; म्हणून या दिवशी नवीन व्यवसाय किंवा उपक्रम चालू करणे, दान करणे श्रेष्ठ मानले जाते.

(संदर्भ : श्री विश्वशांति टेकडीवाल परिवार, मुंबई.)


अक्षय्य तृतीयेला कोणती व्रते करतात ?

१. अक्षय्य तृतीयेला करायची व्रते !

पितृतर्पण, अश्वत्थ प्रदक्षिणा, एकभुक्त आणि अयाचित व्रते यांचेही महत्त्व वैशाख मासात विशेष आहे.

२. वसंतपूजन !

या तिथीला गंध, पुष्पमाला, पन्हे, केळी यांनी ‘वसंतपूजन’ करतात.

३. परशुरामपूजन !

वैशाख शुक्ल अक्षय्य तृतीयेला परशुरामाचा अवतार झाला. जमदग्निपुत्र रामाचे (परशुरामाचे) शस्त्र परशु होते, जसे दशरथी रामाचे चापबाण, श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र, भीमाची गदा, बलरामाचा हल (नांगर) ही शस्त्रे होती. अक्षय्य तृतीयेला प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून अर्घ्य द्यावे. पूजन करावे.

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०१८)


या शुभदिनी काय काय झाले ?

याच तिथीला भगवान परशुरामाची जयंती आहे. त्रेतायुगाचा प्रारंभही याच तिथीला झाला होता. या दिवशी गंगामाता पृथ्वीवर अवतरली आणि याच दिवशी अन्नपूर्णादेवीही अवतरली होती. याच दिवशी वेदव्यासांनी ‘महाभारत’ या जगातील एकमेवाद्वितीय ग्रंथाची रचना चालू केली. कुबेरही याच दिवशी धनाध्यक्ष झाले. युधिष्ठिराला याच दिवशी ‘अक्षय्यपात्र’ मिळाले. आदि शंकराचार्यांनी याच दिवशी ‘कनकधारा’ या स्तोत्राची रचना केली होती.

– श्री विश्वशांति टेकडीवाल परिवार, मुंबई.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी साधनारत राहून देवतेचे चैतन्य अनुभवा !

 

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक