ओटावा – जगाला प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी कॅनडामध्ये चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय वाटाघाटी समितीच्या चर्चेची चौथी फेरी अनिर्णित राहिली. प्लास्टिक उत्पादनात कपात करण्याविषयी जगातील बहुतांश देशांमध्ये एकमताचा अभाव दिसून आला. तथापि २५ नोव्हेंबर २०२४ पासून दक्षिण कोरियातील बुसान येथे होणार्या पाचव्या आणि अंतिम फेरीत प्लास्टिक उत्पादन अल्प करण्यावर चर्चा चालू रहाणार आहे.
१. फ्रेंच पत्रकार क्रिस्टोफ बेचू यांनी सांगितले की, चीन आणि सौदी अरेबिया यांसारखे मोठे पेट्रोकेमिकल उत्पादक देश प्लास्टिकचे उत्पादन अल्प करण्यास विरोध करत आहेत.
२. वर्ष २०१५ मध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की, पृथ्वीला हवामान पालटापासून वाचवण्यासाठी ग्रहांचे सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक काळाच्या तुलनेत १.५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढू देऊ नये.
३. वर्ष २०१७ मध्ये, ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट असेंब्ली’ने प्लास्टिक प्रदूषण दूर करण्याविषयीचा सल्ला देण्यासाठी एक तज्ञ गट सिद्ध केला. या गटाने जगातून हळूहळू प्लास्टिकचे उच्चाटन करण्याच्या योजना सादर केल्या.
४. वर्ष २०१९ मध्ये ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट असेंब्ली’ने प्लास्टिक प्रदूषणापासून जगाचे संरक्षण करण्याचे काम चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.
५. प्लास्टिकच्या उत्पादनामुळे प्रतिवर्षी २.५ अब्ज टन कार्बन उत्सर्जन आणि २२० दशलक्ष टन कचरा निर्माण होत आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे महासागरांची उष्णता वाढत आहे, ज्यामुळे पृथ्वीच्या एकूण तापमानात वाढ होत आहे.