पुणे येथे आर्थिक फसवणूक प्रकरणी ३ अधिवक्ते, १ पोलीस कर्मचारी यांच्यासह ७ जणांवर गुन्हा नोंद !

संगनमताने केली २० लाख रुपयांची फसवणूक

पुणे – ‘आम्हाला कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. तुम्हाला बक्षीसपत्र सिद्ध करून देतो’, असे सांगून मोनिका मंदार खळदकर या महिलेची २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी ३ अधिवक्ते आणि पोलीस कर्मचारी यांच्यासह ७ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिवक्ता तुकाराम कटुले, अनिल मिसाळ, अनंत संकुडे यांच्यासह मनीषा करडे, मंगला राठोड, सुभाष अवघडे आणि १ अनोळखी पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. हा प्रकार जुलै २०१६ ते एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये घडला आहे. या प्रकरणी खळदकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

तक्रारदार महिलेचा ‘ब्युटी पार्लर’ (सौंदर्य प्रसाधन) व्यवसाय आहे. आरोपींनी विश्वास संपादन करून वेगवेगळी बनावट कागदपत्रे सिद्ध करून महिलेची आर्थिक फसवणूक केली. गुन्हा नोंद करतांना १ अनोळखी पोलीस कर्मचारी होता, असे तक्रारदार महिलेने सांगितले; मात्र तो पोलीस खरा आहे काय ? याविषयी अद्याप समजू शकले नाही. तक्रारदारांनी एखाद्या व्यक्तीला पोलिसाचा गणवेश घालून तक्रारदारासमोर उभे केले आहे काय ? याचे अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका :

असे अधिवक्ते आणि पोलीस कर्मचारी असतील, तर कधीतरी कायद्याचे राज्य येईल का ? अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !