Houthi shot US drone: अमेरिकेचे शक्तीशाली ड्रोन पाडल्याचा हुती आतंकवाद्यांचा दावा !

सना (येमेन) – येमेनच्या हुती आतंकवाद्यांनी अमेरिकी सैन्याचे ‘एम्क्यू-९ रीपर’ हे शक्तीशाली ड्रोन पाडल्याचा दावा केला. त्यांनी भूमीवरून डागलेल्या क्षेपणास्त्राने ड्रोनचा माग घेत ते नष्ट केल्याचा व्हिडिओही प्रसारित केला. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामध्ये हुतींनी पुन्हा एकदा आक्रमण करणे चालू केले आहे. २७ एप्रिलला हुती आतंकवाद्यांनी लाल समुद्रात ब्रिटीश तेल टँकर असलेल्या नौकेला लक्ष्य केले. सौदी अरेबियाच्या एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, हुतीने अशा कारवाया केल्याच्या वृत्ताला अमेरिकेच्या वायूदलाने दुजोरा दिला आहे.

सौजन्य Sky News 

भारतासाठी हे चिंतेचे सूत्र असल्याचे मानले जात आहे. याचे कारण याच श्रेणीचे ड्रोन भारत अमेरिकेकडून खरेदी करणार आहे. फेब्रुवारी मासात अमेरिकेशी झालेल्या ३.९९ अब्ज डॉलर्सच्या (३३ सहस्र २७७ कोटी रुपयांच्या) करारानुसार भारत ३१ ‘एम्क्यू-९ बी’ ड्रोन विकत घेणार आहे. भारतीय नौदल यांचा वापर समुद्रात मानवरहित पाळत ठेवण्यासाठी करणार आहे.