PM Modi In Goa : दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात भाजप पुन्हा सत्तेवर येण्याचे संकेत ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सांकवाळ येथील प्रचारसभेत उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान मोदी

पणजी, २७ एप्रिल (वार्ता.) : या निवडणुकीत आतापर्यंत लोकसभेसाठी २ टप्प्यांत मतदान झाले आहे आणि यांमधून भाजपच सत्तेवर येण्याचे संकेत मिळाले आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांकवाळ येथील प्रचारसभेत उपस्थितांना संबोधित करतांना व्यक्त केला.

मोदी पुढे म्हणाले,

‘‘लोकांचा उत्साह पाहून ‘ही प्रचारसभा नव्हे, तर विजय सभा आहे’, असेच वाटते. गोवा भारतभक्तांची भूमी आहे. गोव्यातील मंदिरे आणि चर्च पुष्कळ चांगली आहेत. गोवा हे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ म्हणजेच एकात्मतेचे प्रतीक आहे. गोव्यात कोणताही भेदभाव न करता सरकारी योजना सर्वांपर्यंत पोचवल्या आहेत. हे एक आदर्श असे उदाहरण आहे.

वर्ष २०२४ ची निवडणूक २ विचारधारांमधील निवडणूक आहे. यामध्ये लोकांच्या आशाआकांक्षा यांची पूर्तता करण्यासाठी झटणारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी, तर दुसर्‍या बाजूने स्वार्थासाठी झटणारी ‘इंडि’ आघाडी आहे. मी दिवसरात्र नागरिकांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटत असतो. आम्हाला देशाला आणखी पुढे न्यायचे आहे. त्यासाठी मी अहरात्रो झटतो. पुढील १ वर्षात सरकार नागरिकांसाठी २० कोटी पक्की घरे बांधणार आहे. पक्के घर नसल्यास त्यासंबंधीची माहिती मला द्यावी. ४ जूननंतर नवीन सरकार सत्तेवर आल्यावर पक्के घर नसलेल्यांना पक्के घर बांधून दिले जाणार आहे. ७० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचा वैद्यकीय उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. नवीन सरकार ही योजना आणणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गियांचा आरोग्यावरील खर्च वाचणार आहे. देशात पर्यटकांचा ओढा वाढला आहे आणि याचा गोव्यालाही लाभ झालेला आहे.

काँग्रेस देशाच्या राज्यघटनेला महत्त्व देत नाही. काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू करण्यास तुम्ही देणार का ? काँग्रेस कर्नाटकमध्ये मतपेढीचे राजकारण  करत आहे. काँग्रेसला नागरिकांच्या संपत्तीवर ५५ टक्के कर लावायचा आहे आणि तो पैसा ती त्यांच्या मतपेढीला वाटू पहात आहे. काँग्रेसची मतपेढी कोणती ? ते सर्वांना ठाऊक आहे. काँग्रेसचे काम हे देशविरोधी शक्तीला बळ देण्यासाठी असते. काँग्रेसने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरून लोकांचा विश्वास उडावा, असे काम केले; मात्र त्यांना सर्वाेच्च न्यायालयाने चपराक दिली. काँग्रेसने लोकांना खोटी माहिती दिली आहे. काँग्रेसचा अहंकार वाढल्याने ती लोकांची क्षमा मागणार नाही. गोव्यात माझे भाग्य लिहिले जाते. मी पंतप्रधान बनण्याचा निर्णय गोव्यातच झाला होता.’’

पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी गोमंतकीय भाजपला मतदान करणार ! – सौ. पल्लवी धेंपे

गोमंतकीय नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत-२०४७’चे स्वप्न साकार करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणार आहेत, असा विश्वास दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपे यांनी सांकवाळ येथील सभेत व्यक्त केला.

भाजपने उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी केंद्र आणि राज्य स्तरांवरील भाजपच्या नेत्यांचे आभार मानले.

रमाकांत खलप यांनी ३ लाख ५० सहस्र गोमंतकियांना लुटले ! – मुख्यमंत्री सावंत

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार तथा अधिवक्ता रमाकांत खलप यांनी म्हापसा अर्बन बँकेच्या माध्यमातून ३ लाख ५० सहस्र गोमंतकियांचे पैसे लुटले आहेत. काँग्रेसने म्हापसा अर्बन बँकेला अडचणीत टाकले, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी केली.

क्षणचित्रे

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेला ५० सहस्रांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर येथील प्रचारसभा आटोपून गोव्यात आले. त्यांचे सभास्थळी रात्री ८.१६ वाजता आगमन झाले. मोदी यांचे स्वागत उपस्थितांनी त्यांच्या भ्रमणभाषचा दिवा (टॉर्च) पेटवून आणि भ्रमणभाष संच हातात उंच धरून, तसेच उत्स्फूर्तपणे घोषणा देऊन केले.