वाहतुकीमध्ये पालट
पणजी, २६ एप्रिल (वार्ता.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवार, २७ एप्रिल या दिवशी सायंकाळी सांकवाळ येथे बिट्स पिलानी संकुलाच्या विरुद्ध बाजूने खुल्या जागेत सार्वजनिक सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गोवा विभागाने सार्वजनिक नोटिसीच्या माध्यमातून २७ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय महामार्ग ५६६ वर दाबोळी विमानतळ जंक्शन ते बिर्ला क्रास जंक्शन या मार्गावर काही ठिकाणी रस्ता बंद, तर काही ठिकाणी वाहतुकीत पालट केल्याचे कळवले आहे.
नोटिसीप्रमाणे दाबोळी विमानतळ जंक्शन ते बिर्ला क्रास जंक्शन हा रस्ता दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वसाधारण वाहतुकीसाठी बंद राहील, तर केवळ सभेला येणार्यांसाठीच हा मार्ग खुला असणार आहे. यासाठी आय्.डी.सी.-पणजी-मडगाव या मार्गाने जाणारी वाहतूक दाबोळी विमानतळ जंक्शन येथून चिखली जंक्शन-कुठ्ठाळी जंक्शन या मार्गाने वळवण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे बिर्ला टायटन जंक्शन ते दाबोळी विमानतळ जंक्शन हा मार्ग दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वसाधारण वाहतुकीसाठी बंद असेल, तर केवळ सभेला येणार्या वाहनांसाठी खुला असेल. वास्को येथे जाणारी सर्वसाधारण वाहतूक बिर्ला क्रॉस जंक्शन येथे वळवून ती शरयू टोयोटा स्लिप रोड-कुठ्ठाळी जंक्शन-चिखली जंक्शन या मार्गाने वळवण्यात येणार आहे. यासंबंधी कुणालाही शंका असल्यास त्यांनी वास्को पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (वाहतूक) शैलेश नार्वेकर यांच्याशी ७८७५७५६०७६/ (०८३२) २५११४१४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.