INC Comment On Constitution : काँग्रेसने जनतेची क्षमा मागावी आणि राज्यघटनेविषयी भूमिका स्पष्ट करावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी 

काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्या राज्यघटनेविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण

पणजी : काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी नुकतेच एका प्रचारसभेत बोलतांना भारताने राज्यघटना गोमंतकियांवर बलपूर्वक लादली असल्याचे गंभीर वक्तव्य केले आहे. ‘असे विधान तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरही केले होते’, असेही ते म्हणाले. हा एकप्रकारे ‘राज्यघटना बचाव’च्या नावाने टाहो फोडणार्‍या काँग्रेसने राज्यघटनेचा केलेला घोर अपमानच आहे. ‘पोटात एक आणि ओठात एक’, अशी दुटप्पी अन् राष्ट्रघातकी भूमिका घेणार्‍यांवर जनतेने कसा काय विश्वास ठेवावा ?

काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस

त्यामुळे राज्यघटनेचा घोर अपमान करणार्‍या काँग्रेस पक्षाने जनतेची सार्वजनिकरित्या क्षमा मागावी आणि राज्यघटनेविषयीची तिची भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. ‘गोमंतकियांवर राज्यघटना लादली’ असे म्हणणे म्हणजे ‘तुम्हाला भारतीय राज्यघटना मान्य नाही का ?’, ‘गोवा तुम्हाला आजही पोर्तुगिजांची वसाहत वाटते का ?’, असे प्रश्न उपस्थित होतात. गोवा स्वतंत्र होऊन ६४ वर्षे झाल्यानंतरही गोव्याला एकप्रकारे पोर्तुगिजांची वसाहत समजणार्‍या पोर्तुगीजधार्जिण्या काही लोकांमुळे राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊ शकलेली नाही.

२. काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे गोमंतकीय जनतेसाठी दुहेरी नागरिकत्व मिळण्याची मागणी केली असल्याचे म्हटले आहे. मध्यंतरी गोव्यातील एका बेटावर ध्वजवंदन होऊ दिले नसल्याचेही समोर आले होते, तसेच गोव्यातील काही सहस्र लोकांनी गोव्याला स्वतंत्र राष्ट्र करण्याची मागणीही मध्यंतरी केली होती. या सर्व घटनांतून गोव्यात जाणीवपूर्वक फुटीरतावादी वृत्ती वाढवण्याचे काम चालू आहे, असे दिसून येते. अशा फुटीरतावादी वृत्तीचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.

३. दुहेरी नागरिकत्वाची मागणी ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी घातक आहे. अशा विचारसरणीच्या लोकांना जर काँग्रेस उमेदवारी देत असेल, तर काँग्रेसची विचारसरणी वेगळी कशी मानता येईल ?, असा प्रश्न निर्माण होतो.

४. हा एकप्रकारे देशद्रोह असून या प्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.


सविस्तर वृत्त वाचा – ‘भारताने गोमंतकियांवर बलपूर्वक राज्यघटना लादली !’ – विरियातो फर्नांडिस, काँग्रेस