Doordarshan New Logo : (म्हणे) ‘दूरदर्शनच्या लोकांचे होत असलेले भगवेकरण पाहून वाईट वाटले !’ – तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार

  • तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ‘प्रसार भारती’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांना पोटशूळ !

  • दूरदर्शनच्या नव्या चिन्हाचा रंग लालऐवजी नारंगी केल्यावरून वक्तव्य !

दूरदर्शनचे नवीन चिन्ह व तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ‘प्रसार भारती’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार

नवी देहली – सार्वजनिक प्रसारक वाहिनी असलेल्या दूरदर्शनच्या चिन्हाचा रंग लालवरून नारंगी करण्यात आला आहे. यावरून हिंदुद्वेष्ट्यांचे पित्त खवळले आहे. ‘प्रसार भारती’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी या रंगातील पालटावर टीका करत म्हटले की, दूरदर्शनने त्याचे ऐतिहासिक अधिकृत चिन्ह भगव्या रंगात रंगवले आहे. आता ‘प्रसार भारती’ राहिली नसून ती ‘प्रचार भारती’ झाली आहे. दूरदर्शनच्या लोकांचे होत असलेले भगवेकरण पाहून वाईट वाटले. एक तटस्थ सार्वजनिक प्रसारक आता पक्षपाती शासनासह धर्म (हिंदु) आणि संघ परिवाराचा रंग समाविष्ट करून मतदारांवर प्रभाव टाकेल. जवाहर सरकार हे वर्ष २०१२ ते २०१६ या कालावधीत दूरदर्शन आणि ‘ऑल इंडिया रेडिओ’ यांचे दायित्व असणार्‍या ‘प्रसार भारती’चे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

दूरदर्शनचा संपूर्ण पालट केला आहे ! – गौरव द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रसारभारती

या आरोपांवर प्रसार भारतीचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी म्हणाले की, नवीन नारंगी रंगाचे चिन्ह दिसायला आकर्षक असल्याने हा पालट करण्यात आला आहे. दृश्य सौंदर्यशास्त्र लक्षात ठेवा. चिन्हाचा रंग केशरी नसून नारंगी आहे. केवळ आमचे चिन्हच नव्हे, तर आम्ही दूरदर्शनचा संपूर्ण कायापालट केला आहे. याविषयी लोक तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत, हे दुर्दैव आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले की, भगवावाद आणि सरकारी संस्था यांवर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे पाऊल भारताच्या सार्वजनिक प्रसारकाची तटस्थता आणि विश्‍वासार्हता स्पष्टपणे अल्प करते. (काँग्रेसने ७ दशके देशाचे हिरवेकरण करण्याचे अक्षम्य कृत्य केले आहे. तिची ही घोडचूक सुधारण्याचे कार्य केले जात आहे, असे सरकारने तिला सांगितले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

कथित धर्मनिरपेक्षतेचा ढोल बडवणार्‍या जवाहर सरकार यांना बंगाल राज्याचे त्यांच्या पक्षाने केलेले हिरवेकरण दिसत नाही का ? आता हिंदूंनी तृणमूल काँग्रेसला ‘बांगलादेशाच्या वाटेवर निघालेल्या बंगाल राज्याचे भगवेकरण करू’, असे  ठणकावून सांगितले पाहिजे !