पंढरपूर : १९ एप्रिलला झालेल्या चैत्र एकादशीच्या (कामदा एकादशीच्या) निमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकर्यांची गर्दी होती. केवळ मुखदर्शन आणि उन्हामुळे त्रस्त असलेल्या वारकर्यांना मंदिर समितीच्या गैरव्यवस्थापनाचा फटका बसत होता. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला वेळ लागत होता, शिवाय दर्शनवारीत काही सुरक्षारक्षक वारीत मध्येच लोकांना सोडत असल्याचा एक ‘व्हिडिओ’ प्रसारित होत आहे. या ‘व्हिडिओ’त एक सामान्य महिला वारीच्या रांगेत सुरक्षारक्षक १०-१० लोकांना मधूनच सोडत असल्याविषयी विचारणा करत असल्याचे दिसत आहे. यात संबंधित महिला सुरक्षारक्षक त्या महिलेशी हुज्जत घालून एकाचे नाव सांगून ‘यांना विचारून आम्ही सोडले आहे’, असे सांगतांना दिसत आहे.
येथील अनेक सुरक्षारक्षक गर्दीचे नियोजन न करता भ्रमणभाष पहाण्यामध्ये व्यस्त असल्याचे, तसेच गप्पा मारतांना उभे असलेले दिसत आहेत. वारीमध्ये येणार्या अनेक वारकर्यांना मंदिर प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाचा फटका बसला आहे. या ‘व्हिडिओ’त अन्य एक पुरुष सुरक्षारक्षक ‘व्हिडिओ काढा आणि काय करायचे ते करा’, असे उद्दामपणे बोलतांना दिसत आहे. तरी मंदिर प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वारकर्यांकडून होत आहे.