साधकांची कला आध्यात्मिक स्तरावर सादर होण्यासाठी साधकांकडून प्रयत्न करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘एकदा २ कलाकार काही दिवसांच्या अंतराने गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधन केंद्राला भेट द्यायला आले होते. त्या वेळी त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा मलाही त्या सत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी एका सत्संगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला माझ्यातील स्वभावदोषांची जाणीव करून दिली. त्यानंतर मी स्वभावदोष दूर करण्याचे प्रयत्न केले, त्याबद्दल नंतर झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांनी माझे कौतुकही केले. त्या प्रसंगांत माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात साधकाला ‘तुझे तबलावादन बौद्धिक स्तरावरील आहे’, असे सांगणे

एकदा एक तबलावादक आध्यात्मिक संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. मला त्या सत्संगाला जाण्याची संधी मिळाली. सत्संगात ते कलाकार त्यांच्या तबलावादनाच्या संदर्भातील अनुभूती सांगत होते. तेव्हा गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला म्हणाले, ‘‘तुझे तबलावादन बौद्धिक स्तरावर होत आहे. तुला यांच्यासारखे आध्यात्मिक स्तरावर तबलावादन करता यायला हवे.’’

२. गुरुमाऊलींनी मला स्वभावदोषांची जाणीव करून दिल्यावर आरंभी मला वाईट वाटले. माझ्या मनात ‘माझी बुद्धी कधी नष्ट होणार ? मला तबलावादन जमणार नाही’, असे नकारात्मक विचार आले.

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

३. ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांच्या सतारवादनाच्या वेळी तबलावादन करतांना साधकाची गुरुदेवांना ‘तुम्हाला अपेक्षित असे तबलावादन करून घ्या’, अशी प्रार्थना होणे आणि ‘गुरुदेवच तबलावादन करून घेत आहेत’, असे साधकाला जाणवणे

त्या सत्संगानंतर एक घंट्याने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ५५ वर्षे) यांचा सतारवादनाचा प्रयोग होता. त्यांच्या सतारवादनाच्या वेळी मी आणि एक तबलावादक कलाकार तबल्याची साथ करणार होतो. तेव्हा मला गुरुदेवांचे ‘तुझे तबलावादन बौद्धिक स्तरावर होत आहे’, हे वाक्य सतत आठवत होते. श्री. सहस्रबुद्धेकाकांना तबल्याची साथ देण्यास आरंभ करण्यापूर्वी मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, माझ्यातील बुद्धीचा अडथळा दूर होऊ दे. माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित असे तबलावादन होऊ दे.’ तेव्हा ‘गुरुदेवच माझ्याकडून तबलावादन करून घेत आहेत’, असे मला जाणवत होते. त्यामुळे सहस्रबुद्धेकाकांना तबल्याची साथ देतांना मला वेगळाच आनंद मिळत होता.

४. एका नृत्यांगनेने आध्यात्मिक संशोधन केंद्राला भेट देणे आणि गुरुदेवांनी सत्संगात ‘नृत्यांगना करणार असलेल्या नृत्याच्या प्रयोगाच्या वेळी गिरिजयला तबल्याची साथ करायला घ्या’, असे सांगणे अन् साधकाला ‘गुरुदेवच सर्वस्व आहेत आणि तेच घडवत आहेत’, असे वाटणे

श्री. गिरिजय प्रभुदेसाई

त्यानंतर ५ – ६ दिवसांनी एका कथ्थक नृत्यांगनेने आध्यात्मिक संशोधन केंद्राला भेट दिली. त्या वेळी त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा मला त्यांच्या सत्संगात बसण्याची संधी मिळाली. तेव्हा  गुरुदेवांनी सांगितले, ‘‘नृत्यांगना करणार असलेल्या नृत्याच्या प्रयोगाच्या वेळी तबल्याची साथ करण्यासाठी गिरिजयला घ्या.’’

मी १५ वर्षे २ गुरूंकडे तबलावादनाचे शिक्षण घेतले; पण आजपर्यंत कुणी अन्य कलाकारांना ‘गिरिजयला तबलावादन करायला घ्या’, असे सांगितले नाही. परात्पर गुरुदेवांनी मला त्या नृत्यांगनेला नृत्याच्या प्रयोगाच्या वेळी तबल्याची साथ करण्यास सांगितले. तेव्हा मला वाटले, ‘गुरुदेवच माझे सर्वस्व आहेत आणि तेच मला घडवत आहेत.’ गुरुदेवांचे गिरिजयला सांगितलेले ‘आता त्यांच्या नृत्यासमवेत तबल्याच्या साथीला घ्या’, हे वाक्य आठवले, तरीही माझी भावजागृती होते.

५. ‘गुरुदेव साधकांना घडवण्यासाठी साधकांकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून घेत आहेत’, याची जाणीव होणे

‘गुरु शिष्याला घडवण्यासाठी त्याच्या चुकाही दाखवतात आणि नंतर त्याच्यावर प्रेमही करतात’, याची मला प्रचीती आली. गुरुदेव साधकांकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून घेत आहेत. ‘ते आमच्याकडून आमची कला आध्यात्मिक स्तरावर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून घेत आहेत’, त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

६. प्रार्थना

‘हे गुरुदेवा, ‘तुम्हीच माझ्याकडून माझ्यातील बुद्धीचा अडथळा दूर होण्यासाठी प्रयत्न करून घ्या. तुम्हीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित असे आध्यात्मिक स्तरावरील तबलावादन करून घ्या’, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. गिरिजय प्रभुदेसाई, संगीत विशारद (तबला), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक