नाशिक – ‘मी नव्यानेच चांदवड शहरात तहसीलदार म्हणून आलो आहे. कार्यक्रमासाठी कपडे आणि भांडे घ्यायचे आहे’, असे तोतया तहसीलदाराने चांदवड येथील दुकानदारांना सांगितले. त्यानंतर तोतया तहसीलदाराने दुकानदारांकडून ४ पैठणी साड्या, ४ रेडिमेड सूट आणि तब्बल २५ सहस्र रुपयांचे भांडे असे एकूण ६० ते ७० सहस्र रुपयांचे साहित्य घेऊन पलायन केले. तोतया तहसीलदाराने ‘स्वयंपाकीला पैसे द्यायचे आहेत’, असे सांगून एका दुकानदाराकडून १० सहस्र रुपयेही घेतले आहेत. तहसीलदार न आढळल्याने फसवणूक झाल्याचे दुकानदारांना लक्षात आले. त्यानंतर दुकानदार दत्ता गांगुर्डे यांनी चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे तोतया तहसीलदाराचा शोध घेत असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :अशांना शोधून काढून त्यांच्याकडून सर्व साहित्य कह्यात घेऊन पैसेही वसूल करायला हवेत ! |