पुणे येथे ‘नूतन मराठी विद्यालया’तील इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांस शिक्षिकेकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण !

सामाजिक माध्यमांमध्ये चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पालकांना समजले

पुणे – शहरातील अत्यंत जुन्या आणि नामवंत ‘शिक्षण प्रसारक मंडळी’ या शिक्षण संस्थेच्या बाजीराव रस्त्यावरील ‘नूतन मराठी विद्यालया’मध्ये इयत्ता ९ वीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यास पूजा सुनील केदारी या शिक्षिकेने बेदम मारहाण केली. ही शिक्षिका विद्यार्थ्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असलेली चित्रफीत सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर सदरचा प्रकार पालकांना समजला. त्यानंतर पालकांकडून ८ एप्रिल या दिवशी विश्रामबाग पोलीस ठाण्यात शिक्षिकेच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. ही घटना ७ मार्च या दिवशी घडली होती.

पीडित मुलगा ‘नूतन मराठी विद्यालया’मध्ये इयत्ता ९ वीमध्ये शिकतो. ७ मार्च या दिवशी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. वर्गामध्ये सर्व मुले एकमेकांशी घोळका करून बोलत होती. त्याच वेळी शिक्षिका वर्गामध्ये आल्या. त्यांनी पीडित मुलाच्या जवळ जाऊन कसलीही विचारपूस न करता लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास प्रारंभ केला, असे तक्रारींमध्ये नमूद केले आहे.

मुलाला धमकी ‘कुणाला सांगायचे त्याला सांग !’

शिक्षिकेने मुलाचे दोन्ही हात पिरगळले. त्याचे तोंड कचर्‍याच्या डब्यात घालून लाथा घातल्या. मारहाण केल्याविषयी ‘कुणाला सांगायचे त्याला सांग’, अशी धमकीसुद्धा दिली. घाबरलेल्या मुलाने हा प्रकार आई-वडिलांनासुद्धा सांगितला नाही. वार्षिक परीक्षेमध्ये नापास करतील, अशी भीती मुलाच्या मनात होती. (असे शिक्षक विद्यार्थ्यांना कधीतरी घडवू शकतील का ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक)

‘शिक्षण प्रसारक मंडळी’ या संस्थेच्या अध्यक्षांना पत्र !

या संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस्.के. जैन यांना पीडित पालकांनी पत्र दिले आहे. यात मुलाला केलेल्या मारहाणीचा प्रकार गंभीर असून संस्थेने संबंधित शिक्षिकेस नोकरीतून बडतर्फ करावे. या शिक्षिकेने यापूर्वीही अनेक मुलांना अशीच मारहाण केली आहे, अशा तक्रारीही आहेत. जर या शिक्षिकेला बडतर्फ केले नाही, तर पोलीस, न्यायालयामध्ये तक्रार करावी लागेल, असेही पत्रांमध्ये नमूद केले आहे.