अरुण नदीवर बांधलेल्या धरणामुळे येणार पूर !
काठमांडू (नेपाळ) – चीन शेजारील देशांच्या सार्वभौमत्वाशी सतत छेडछाड करत आहे. चीनने शेजारील देश नेपाळच्या एका भागात अतिक्रमण चालू केले आहे. नेपाळ-चीन सीमेवर कोसी राज्यातील कीमथंका गावात बंधारा बांधण्यात येत आहे. या बांधकामामुळे येथून वाहणार्या अरुण नदीचा प्रवाह चीनने वळवला आहेच; पण या अतिक्रमणामुळे आता पुढच्या पावसाळ्यात नेपाळच्या परिसरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, नेपाळच्या विविध भागांत चीन सातत्याने अतिक्रमण करत आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार चीनकडून नेपाळच्या अरुण नदीच्या काठावर अनुमाने १ किलोमीटर लांबीचा बंधारा बांधण्यात आला आहे. चीनने केलेले हे बांधकाम नेपाळच्या हद्दीतील अतिक्रमण आहे. काही दिवसांपूर्वी या बांधकामामुळे नेपाळमधील ९ हेक्टरहून अधिक नेपाळी भूमीची हानी झाली होती. चीन किंवा नेपाळ यांपैकी कुणीही ते स्वीकारत नाही. याआधीही चीनने नेपाळच्या भूमी अतिक्रमणच केले नाही, तर नेपाळच्या अनेक श्रद्धास्थानांची नावेही पालटली आहेत.
नेपाळ उघडपणे चीनला विरोध करू शकत नाही ! – तज्ञ
देहली विद्यापिठातील चीन प्रकरणातील आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. अभिषेक प्रताप सिंह यांनी सांगितले की, नेपाळ अनेक गोष्टींत उघडपणे चीनला विरोध करू शकत नाही. याची अनेक कारणे आहेत. यामध्ये चीनने नेपाळमध्ये केलेल्या गुंतवणुकीव्यतिरिक्त त्याला मिळणारे साहाय्य, हा मोठा पैलू आहे.
परराष्ट्र व्यवहारातील तज्ञ प्रा. जे.पी. चक्रवर्ती यांनी सांगितले की, वर्ष २०२० मध्ये नेपाळच्या ३६ हेक्टर क्षेत्रात चिनी अतिक्रमणाचा अहवाल चीनकडून आला होता. उत्तर सीमेवर नेपाळी भूमीवर चीनने केलेल्या आक्रमणाची बातमी देणार्या पत्रकाराने आत्महत्या केली होती. याविषयी नेपाळमध्ये अनेक चर्चा चालू झाल्या होत्या. गेल्या वर्षीच नेपाळमधील गंडकी राज्यातील मुस्तांग जिल्ह्यात चीनने केलेल्या रस्तेबांधणीची माहिती समोर आली होती. याखेरीज नेपाळमध्येही अनेक गावांतील चिनी कुंपणांची माहिती समोर येत असते. केंद्रीय गुप्तचर संस्थेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन नेपाळमध्ये सातत्याने हस्तक्षेप करत आहे; मात्र सर्व प्रकारच्या दबावामुळे नेपाळ उघडपणे विरोध करू शकत नाही.
संपादकीय भूमिकानेपाळचे शासनकर्ते आणि राजकारणी चीनचे बटिक बनले असले, तरी नेपाळी हिंदू जनतेने याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे ! |