‘१४.६.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे पूजन झाले. त्या वेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असतांना सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ‘हिंदु राष्ट्राचा ध्वज फडकावत आहेत’, असे जाणवणे
‘धर्मध्वजाच्या ध्वजारोहणाचे दृश्य फार रमणीय होते. ते मनात ‘क्षात्रतेज’ निर्माण करणारेही होते. ‘जणू श्रीविष्णूने संपूर्ण हिंदु राष्ट्राची धुरा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हातात दिली आहे आणि त्या हिंदु राष्ट्राचा ध्वज फडकावत आहेत’, असे मला जाणवले.
२. ध्यानात दिसलेले दृश्य
ते दृश्य पहात असतांना मध्येच काही क्षण माझे ध्यान लागल्यासारखे झाले आणि मला ध्यानात पुढीलप्रमाणे दिसले.
अ. ‘पुष्कळ संघर्ष केल्यानंतर वर्ष २०२५ मध्ये येणार्या ‘हिंदु राष्ट्राची’ पहाट आपण अनुभवत आहोत. आता प्रत्यक्ष हिंदु राष्ट्र आले आहे.
आ. सर्व संत, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ एकत्र आले आहेत.
इ. सूक्ष्मातून सर्व देवीदेवता, ऋषिमुनी आणि चांगल्या शक्ती हा सोहळा पहात आहेत आणि ते सर्वांना आशीर्वाद देत आहेत.
ई. आपण डोळ्यांत प्राण एकवटून आपले जीवन कृतार्थ करणार्या आपल्या प्राणप्रिय तिन्ही गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) दर्शन घेत आहोत.
उ. श्री गुरूंच्या कृपेने ‘हिंदु राष्ट्र’ आले; म्हणून सर्व जण कृतज्ञतेच्या भावाश्रूंनी न्हाऊन निघत आहेत.
ऊ. त्या वेळी ईश्वरी कृपेने हिंदु राष्ट्र आले; म्हणून प्रत्यक्ष ब्रह्मांडाचे स्वामी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मात्र ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करत होते. त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू होते. ‘साधकांनी सातत्याने संघर्ष करत येथपर्यंत येण्यासाठी किती प्रयत्न केले !’, असे म्हणून अत्यंत प्रेमाने ते त्यांच्या सर्व लेकरांना न्याहाळत होते.
ए. हा ‘हिंदु राष्ट्रा’चा प्रचंड मोठा ध्वज आहे आणि त्याचे ध्वजारोहण श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ करत आहेत. श्री चित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘हिंदु राष्ट्रा’च्या ध्वजाला प्रार्थना करत आहेत. सर्व देवता पुष्पवृष्टी करत आहेत.
ऐ. ध्वज जसजसा वर वर जात होता, तसा तो ध्वज आणि श्री सत्शक्ति (सौ.) सिंगबाळ उंच उंच होऊन संपूर्ण ब्रह्मांडात त्यांचे अस्तित्व जाणवत होते अन् ते इतके उंच झाले की, आपण पाहूच शकत नव्हतो.
ओ. सर्व जण हा सोहळा भावविभोर होऊन पहात आहेत.’
– (सद्गुरु) अनुराधा वाडेकर, ठाणे. (१६.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |