शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणार्‍या अभ्यागतांना थंड पेये पिण्यासाठी उपलब्ध करून द्या ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी

अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर

कोल्हापूर – जलशुष्कता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शालेय स्तर, तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात येणार्‍या अभ्यागतांना थंड पेये पिण्यासाठी उपलब्ध करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्राणीजन्य आजाराच्या प्रतिबंध आणि नियंत्रण एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, वातावरणातील पालट अन् मानवी आरोग्य या विषयांवर जिल्हा स्तरावर आढावा बैठक झाली. या वेळी त्यांनी या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘शेतामध्ये काम करणारे शेत कामगार, व्यायाम करणारी तरुण मुले, शालेय मुले, तसेच कायम प्रवास करणार्‍यांना जलशुष्कता होऊ नये; म्हणून त्यांनी पाण्याची बाटली समवेत ठेवावी. यासाठी घरोघरी जनजागृती करावी. ग्रामीण भाग, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या अन् पाळीव कुत्र्यांचे १०० टक्के निर्बीजीकरण, लसीकरण करण्याची कार्यवाही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेने १५ दिवसांत करावी.’’