बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करणार्यांना सुनावले !
ढाका (बांगलादेश) – मालदीवपासून प्रेरणा होऊन बांगलादेशमध्ये विरोधी पक्षांकडून ‘इंडिया आऊट’ मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बांगलादेशातील निवडणुकीच्या वेळेपासून विरोधी पक्ष विशेषत: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बी.एन्.पी.) हा पक्ष सामाजिक माध्यमांतून ‘इंडिया आऊट’ मोहीम राबवत आहे. गेल्या आठवड्यात बी.एन्.पी.च्या एका नेत्याने भारतीय वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा एका भाग म्हणून त्याच्याकडे असलेले काश्मिरी शाल फेकून दिली होती. या प्रकरणात आता बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी विधान केले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्या (विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या) बायकांकडे किती भारतीय साड्या आहेत ? जेव्हा तुम्ही तुमच्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर तुमच्या बायकोकडे असलेल्या या साड्या जाळाल, तेव्हाच तुम्ही भारतात बनवलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालत आहात, हे सिद्ध होईल.’’
१. बांगलादेशातील लोक त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी भारतातून पाठवल्या जाणार्या वस्तूंवर अवलंबून असतात. यामध्ये भाजीपाला, तेल, सौंदर्य प्रसाधने, कपडे, भ्रमणभाष आणि वाहन यांचा समावेश आहे.
२. बांगलादेशातील मोठी लोकसंख्या भारतातून येणारे दागिने आणि फॅशनेबल कपडे यांसारख्या वस्तू खरेदी करते. एवढेच नाही, तर भारतातून निर्यात होणारा कच्चा माल, कापूस आणि कुशल कारागीर यांना बांगलादेश उद्योगात पुष्कळ मागणी आहे.