Goa Loksabha Elections 2024 : पणजी येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेत भाजपच्या नेत्यांचा प्रचाराला प्रारंभ !

लोकसभा निवडणूक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, दोन्ही उमेदवार आणि मंत्रीगण यांची उपस्थिती

श्री महालक्ष्मीदेवीला नमस्कार करतांना खासदार सदानंद शेट तानावडे, सौ. पल्लवी धेंपे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर

पणजी, २६ मार्च (वार्ता.) : भाजपने पणजी येथे २६ मार्च या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्याचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपे, काही मंत्री आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी, तसेच मगोचे श्री. सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती होती.

या वेळी उत्तर गोव्यातून १ लाखाहून अधिक, तर दक्षिण गोव्यातून ६० सहस्रांहून अधिक मताधिक्क्याने उमेदवारांना निवडून आणण्याचे ध्येय भाजपच्या नेत्यांनी बाळगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्ष २०४७ मध्ये भारत एक विकसनशील देश बनवण्याचे स्वप्न केंद्रस्थानी ठेवून भाजप लोकसभेचा प्रचार करणार आहे. मागील १० वर्षांत केंद्राच्या साहाय्याने गोव्याचा केलेला विकास, केंद्राच्या महत्त्वपूर्ण योजना राज्य सरकारने अंत्योदय पातळीवर नेऊन त्या तळागाळातील जनतेपर्यंत पोचवणे, याची माहिती प्रचाराच्या वेळी देण्यात येणार आहे.

भाजपच्या नेत्यांनी घेतला पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचा आशीर्वाद !

पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचा आशीर्वाद घेतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे

डिचोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोवा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपे यांनी हातुर्ली येथील मठात पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार प्रेमेंद्र शेट आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती.

काँग्रेसचे दोन्ही उमेदवार आज घोषित होणार

पणजी : काँग्रेस लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागांसाठी विरोधी आघाडीचे उमेदवार २७ मार्च या दिवशी घोषित करणार आहे. काँग्रेसच्या निवडणूक समितीची २७ मार्च या दिवशी सायंकाळी देहली येथे बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव देहली येथे जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आर्.जी.) या दोन्ही पक्षांनी त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत. या वेळी निवडणुकीत भाजप, काँग्रेससह विरोधी पक्षांची आघाडी आणि ‘आर्.जी.’ या ३ पक्षांचे उमेदवार रिंगणात असतील.