‘३०.७.२०२३ या दिवशी रात्री मी ‘श्री दक्षिणामूर्ती स्तोत्र’ ऐकत होते. त्या वेळी आपोआप मला काही सूक्ष्म दृश्ये दिसू लागली. ती पहातांना माझे मन निर्विचार स्थितीत गेले आणि मला पुष्कळ छान वाटत होते. त्यांचे वर्णन येथे दिले आहे.
१. शिवाचे रूप सूक्ष्मातून डोळ्यांसमोर येऊन त्याच्या जटेमधून अणूंप्रमाणे कण बाहेर येतांना दिसणे आणि ते कण, म्हणजे ब्रह्मांड असल्याचे जाणवणे
‘श्री दक्षिणामूर्ती स्तोत्र’ ऐकतांना आरंभी शिवाचे रूप माझ्या डोळ्यांसमोर आले. नंतर मला शिवाची जटा दिसली. त्या जटेतून मोठा ‘ॐ’ बाहेर पडला. तो पुष्कळ तेजस्वी होता. तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर संपूर्ण पांढरा प्रकाश आला. त्यानंतर अणू-रेणूंप्रमाणे अगदी बारीक बारीक कण त्याच्या जटेतून वेगाने बाहेर येऊ लागले. हे दृश्य दिसल्यावर माझ्या बुद्धीला प्रश्न पडला, ‘हे कण कसले आहेत ? आणि ते शिवाच्या जटेतून का बाहेर पडत आहेत ?’ त्यानंतर देवाने आतून उत्तर दिले, ‘हे कण म्हणजे ब्रह्मांडे आहेत. विश्वात अनंत कोटी ब्रह्मांडे आहेत आणि ती शिवाच्या जटेतून निर्मिली आहेत.’ तेव्हा ‘भगवान शिवासाठी अनंत कोटी ब्रह्मांडे किती छोटी आहेत ! भगवान शिवच साक्षात् आदिगुरु आहेत’, याची मला जाणीव झाली. हे दृश्य पहातांना मला पुष्कळ अंतर्मुखता जाणवत होती.
२. शरिराच्या आत गारवा जाणवणे
अ. कण दिसल्यानंतर मला काही क्षण रजनीगंधा या फुलाचा सूक्ष्म गंध आला. त्यानंतर चंदनाचा सुगंध आला अणि शरिराच्या आत गारवा जाणवू लागला.
आ. यानंतर माझ्या डोळ्यांसमोर एक वटवृक्ष आला. तेव्हा मला गारवा जाणवला आणि त्याच वेळी स्तोत्रामध्ये या विषयाचे वर्णन केलेल्या ओळी म्हटल्या गेल्या.
३. भगवान शिवाला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रार्थना होणे
मी भगवान शिवाला ‘माझे स्वभावदोष आणि अहं, म्हणजे तुझ्या चरणांखालील अपस्मार (किंवा मूमूलक) नावाचा दैत्यच आहे. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं याचा तूच समूळ नाश कर’, अशी प्रार्थना केली. तेव्हा मला संपूर्ण हलके वाटत होते. ‘भगवान शिवाच्या चरणी मी स्वतः समर्पित झाले आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला.
(शिवाचे एक रूप असलेल्या नटराजाच्या मूर्तीच्या चरणांखाली अपस्मार किंवा मूमूलक या नावाचा दैत्य असतो. – संकलक)
कृतज्ञता
‘हे शिवस्वरूप गुरुदेवा, आदिगुरु शिव म्हणजे आपणच आहात. आपल्याच कृपेने मला ही अनुभूती आली. यासाठी मी आपल्या ब्रह्मांडव्यापी चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते !’
– परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१२.८.२०२३)
|