सनातन प्रभात > Post Type > साधना > परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्म ज्ञानाद्वारे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील वक्त्यांची गुणवैशिष्ट्ये शोधण्यास सांगणे आणि त्याद्वारे परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून ज्ञान मिळण्याच्या एका नव्या पैलूची ओळख करून देणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्म ज्ञानाद्वारे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील वक्त्यांची गुणवैशिष्ट्ये शोधण्यास सांगणे आणि त्याद्वारे परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून ज्ञान मिळण्याच्या एका नव्या पैलूची ओळख करून देणे
‘गेल्या अनेक वर्षांपासून गोवा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या सूक्ष्म परीक्षणाची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली. त्यात मी अधिवेशनाच्या ठिकाणी सूक्ष्मातून ‘कोणत्या चांगल्या शक्ती आणि अनिष्ट शक्ती आल्या आहेत ? अनिष्ट शक्ती अधिवेशनात कशा प्रकारे विघ्ने आणत आहेत ?’ इत्यादी पैलूंचा अभ्यास करत होतो.’
यंदा प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सांगितले की, ‘या अधिवेशनात केवळ वक्त्यांचेच सूक्ष्म परीक्षण करायचे आहे. त्यांच्यात ‘कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत ?’, याचा अभ्यास सूक्ष्म ज्ञानाद्वारे करायचा आहे.’ यापूर्वी असे सूक्ष्म परीक्षण मी कधी केले नसल्याने माझ्यासाठी हा विषय नवीन होता. गुरूंचा आशीर्वाद असल्याने ही सेवा माझ्याकडून सहजतेने पूर्ण झाली. त्यातून वक्त्यांची गुणवैशिष्ट्ये सूक्ष्मातून अभ्यासण्याच्या एका नवीन पैलूची ओळख परात्पर गुरु डॉक्टरांमुळे झाली, तसेच या सेवेतून त्यांनी ‘व्यक्तीचा अभ्यास सूक्ष्म ज्ञानाद्वारे करता येतो’ हेही शिकवले. त्याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.६.२०२३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक