रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. सुनील नाईक (वय ४२ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या पत्नी सौ. सुषमा नाईक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. जवळीक साधणे : ‘श्री. नाईक यांची वाणी आणि कृती यांमधून प्रेमभाव जाणवतो. नातेवाईक त्यांना आवर्जून भ्रमणभाष करतात. त्यांची सर्वांशी लगेचच जवळीक होते. त्यामुळे साधकही त्यांना घरून आणलेला खाऊ पाठवतात. त्यांच्या सहवासात आनंद जाणवतो.
१ आ. संतांनी कौतुक करणे : अनेक संतांनी ‘ते सेवा चांगली करतात’ म्हणून त्यांचे कौतुकही केले आहे. संत त्यांना बोलावून प्रसादही देतात.
१ इ. प.पू. डॉक्टरांप्रती असलेला भाव : कुठलेही जागृत देऊळ, तीर्थक्षेत्र किंवा आध्यात्मिक क्षेत्र येथे गेल्यावर ते स्वतःसाठी, माझ्यासाठी किंवा घरच्यांसाठी कधीही काही मागत नाहीत. ते केवळ ‘प.पू. डॉक्टरांचे आरोग्य चांगले व्हावे, त्यांची प्राणशक्ती वाढावी’, यासाठी व्याकुळतेने प्रार्थना करतात. प्रार्थना करतांना भाव जागृत होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वहातांना दिसतात.
२. जाणवलेले पालट
२ अ. व्यष्टी साधनेबद्दलचे गांभीर्य वाढणे : ते व्यष्टी साधनेचे काहीच प्रयत्न करत नसल्यामुळे ते मागील वर्षी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रकियेत होते. आता ते सेवा करून आल्यावर लगेचच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या अंतर्गत लिखाण करायला बसतात. त्यानंतर ते सूचनासत्रे करणे, दैनंदिनी लिहिणे आणि प्रार्थना करणे असे प्रयत्न करूनच झोपतात. आधीच्या तुलनेत त्यांचे व्यष्टीचे गांभीर्य वाढले आहे.
२ आ. मनमोकळेपणाने बोलणे : गेल्या वर्षभरात ‘मनमोकळेपणाने न बोलणे’ हा त्यांचा दोष सांगितला होता. आता ते स्वतःहून अडचणी, आजारपण आणि उपाय यां संदर्भात विचारून घेतात आणि त्यानुसार कृतीही करतात.
‘त्यांचा गुरुमाऊलीच्या प्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) भाव वाढून त्यांची पुढच्या टप्प्याची साधना जलद गतीने होऊ दे’, हीच गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना !’
– सौ. सुषमा नाईक (पत्नी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |