IPU India Responded Pakistan : पाकने भारताला उपदेश करण्यापेक्षा आतंकवाद्यांची निर्मिती करणारे कारखाने बंद करावेत !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला सुनावले !

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – भारताला उपदेश करण्यापेक्षा पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणे करणार्‍या आतंकवाद्यांच्या निर्मितीचे कारखाने बंद करावेत, अशा शब्दांत येथील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात ‘पार्लमेंटरी युनियन’च्या बैठकीच्या वेळी भारताचे प्रतिनिधित्व करत असलेले राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी पाकिस्तानला फटकारले. याखेरीज हरिवंश यांनी ‘जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील’ याचा पुनरुच्चार केला. पाकच्या प्रतिनिधीने केलेल्या भाषणात जम्मू-काश्मीरवरून भारतावर टीका केली होती. त्याला हरिवंश यांनी प्रत्युत्तर देतांना वरील शब्दांत फटकारले.

हरिवंश पुढे म्हणाले की,  

१. लोकशाही नांदण्याविषयी वाईट इतिहास असलेल्या देशाने आम्हाला भाषण देणे हे हास्यास्पद आहे. पाकिस्तानने असे आरोप करून या मंचाचे महत्त्व अल्प केले नसते, तर बरे झाले असते. भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे आणि माझे भाग्य आहे की, अनेक देशांनी भारतीय लोकशाहीला अनुकरणीय मानले आहे.

२. जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांचा संबंध आहे, ते भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि नेहमीच रहातील. कितीही खोटेपणा आणि चुकीचा प्रचार करून ही वस्तूस्थिती पालटू शकत नाही.

३. पाकिस्तानला त्यांचे आतंकवादी निर्मितीचे कारखाने बंद करण्याचा सल्ला द्यायला हवा. पाकिस्तानचा आतंकवाद्यांना आश्रय देण्याचा, साहाय्य करण्याचा आणि सक्रीयपणे पाठिंबा देण्याचा इतिहास आहे.

४. जागतिक आतंकवादाचा चेहरा ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये सापडला होता, याची आठवण पाकिस्तानला करून द्यायला हवी. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बंदी घातलेल्या सर्वाधिक आतंकवाद्यांना या देशाने आश्रय दिला आहे.

संपादकीय भूमिका

‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ अशी हिंदीत म्हण आहे. ती पाकिस्तानला लागू पडते. पाकला शब्दांतून कितीही सांगितले, तरी त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर देण्याची आवश्यकता आहे !