१. ध्यान करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. ध्यान करतांना मनात ‘स्वस्वरूपे संस्थापिला श्रीमंत योगी’ असे येणे : ‘एकदा मी पहाटे ध्यानाला बसलो असतांना माझे लक्ष श्वासावर केंद्रित झाले आणि त्याच क्षणी मला चंदनाचा सुगंध आला. माझ्या मनात ‘स्वस्वरूपे संस्थापिला श्रीमंत योगी’, ही एक ओळ तरळून गेली. मी ही ओळ कुठे वाचली असल्याचे किंवा ऐकल्याचे आठवत नाही. काही दिवसांपासून माझ्या मनात ‘स्वस्वरूपे’ हे शब्द सतत येत होते.
१ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अनुभूतीचे केलेले विश्लेषण : मी ही अनुभूती श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सांगितली. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘स्वस्वरूप हे चिरंतन आत्म्याशी संबंधित आहे आणि आपल्याला तेथपर्यंत जायचे आहे’, असे ईश्वराला यातून सुचवायचे आहे. समर्थ रामदासस्वामी शिवरायांना ‘श्रीमंत योगी’ असे संबोधत असत. या स्वस्वरूपाच्या ऊर्जेतूनच शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली आणि आता याच कार्यासाठी तुम्ही रामनाथी आश्रमात येत आहात.’’ (आमचे बोलणे झाल्यानंतर अनुमाने १ मासाने आम्ही सांगली येथून गोवा येथे पूर्णवेळ साधना करण्यासाठी आलो.)
२. १९.४.२०२१ या दिवशी ध्यानात स्फुरलेल्या ओळी
‘१९.४.२०२१ या दिवशी मी पहाटे ध्यानाला बसलो आणि लगेचच माझ्या डोळ्यांसमोर ज्ञानदेव आले. त्यांना पाहून मला त्वरित पुढील ओळी स्फुरल्या. (ही अवस्था अशी होती की, गाढ ध्यानावस्था तर नव्हती; पण बाहेरच्या संवेदनांची जाणीव अत्यल्प होती. मला ओळी स्फुरत होत्या आणि त्या पुन:पुन्हा पहिल्यापासून मनातल्या मनात म्हटल्या जात होत्या. एवढे होऊनही जागेपणी लिहितांना मला शेवटचे कडवे आठवले नाही.)
ज्ञान द्या, मज ज्ञान द्या ।
ज्ञानदेवा, ज्ञान द्या ।। १ ।।
स्फुरवाचे (टीप १) ज्ञान द्या, प्रसवाचे (टीप २) ज्ञान द्या ।
अर्थाचे ज्ञान द्या, ज्ञानराजा ।। २ ।।
स्थुलाचे ज्ञान द्या, सूक्ष्माचे ज्ञान द्या ।
अतिसूक्ष्माचे ज्ञान द्या, ज्ञानराजा ।। ३ ।।
ज्ञानाचा महामेरु, माऊलीसम सांभाळू ।
विश्वाचा उद्धारू ज्ञानराजा ।। ४ ।।
योगियांचा योगी, नवनाथांचे अंगी ।
योगशास्त्र सांगी सर्व जगा ।। ५ ।।
विनवितो तुम्हा, असे मी ज्ञानाचा भुकेला ।
द्या प्रकाश जीव उद्धराया ।। ६ ।।
टीप १ : ज्ञान स्फुरू दे
टीप २ : मिळालेले ज्ञान लोकांना सांगण्याचे
त्यानंतर ३ दिवसांनी मी ही कविता श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाठवली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘सुंदर ओळी सुचल्या. मुख्य म्हणजे जागेपणी त्या आठवल्या, हीच भगवंताची कृपा !’’
– श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ५५ वर्षे), फोंडा, गोवा.
|