अमेरिकेचे पाक आणि तालिबान यांना आवाहन !
वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई आक्रमणांवर अमेरिकेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेने तालिबानला ‘अफगाणिस्तानच्या भूमीतून आतंकवादी आक्रमण केले जाणार नाही’, याची काळजी घेण्याचे आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. आतंकवादविरोधी कारवायांमध्ये नागरिकांची हानी होऊ नये, असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे मुख्य उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी ‘अफगाणिस्तान हे अमेरिका आणि त्याचे मित्रराष्ट्र यांना हानी पोचवू पहाणार्या आतंकवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनू नये, यासाठी अमेरिका कटीबद्ध आहे’, असे सांगितले.
अफगाणिस्तानला उत्तरदायी धरू नका !
अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी म्हटले की, पाकिस्तान सातत्याने आक्रमक कारवाया करत आहे. अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागांत पाकचे सैन्य जाणूनबुजून आमच्या नागरिकांवर आक्रमण करत आहे.
दोन्ही देशांनी एकमेकांवर केले आरोप !
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या २ वर्षांत आम्ही आतंकवादी गटांच्या उपस्थितीबद्दल अफगाण सरकारला वारंवार गंभीर चिंता व्यक्त केली आहे; पण तो मान्य झाला नाही आणि सैन्याच्या चौकीवर आक्रमण केले.
पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे की, आतंकवादाला अफगाणिस्तानचा पूर्ण पाठिंबा आणि साहाय्य आहे.
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हवाई आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या सुरक्षादलांनी सीमेवर पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले. आम्ही या आक्रमणांचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानच्या अधिकार्यांना बोलावून घेतले. पाकिस्तान स्वतःच्या चुका लपवण्यासाठी अशा गोष्टी करत आहे.