१. सनातन संस्थेने अकोला येथे आयोजित केलेले ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ हे प्रवचन ऐकून साधना करण्याचा निर्धार होणे
‘वर्ष १९९९ मध्ये प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने मला सनातन संस्थेने अकोला येथे आयोजित केलेले ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली. ते प्रवचन ऐकल्यावर ‘मनुष्यजीवनाचे आणि धर्माप्रतीचे कर्तव्य काय आहे ?’, हे मला कळले आणि माझा साधना करायचा निर्धार झाला.
२. श्रोत्यांसमोर बोलण्याचे धैर्य नसणे; मात्र सनातन संस्थेचे सत्संग घेऊ लागल्यावर अंगात शक्ती संचारून सर्वांसमोर बोलता येणे, तेव्हा ‘सनातन संस्थेत स्वतःचा सर्वांगीण विकास होणार’, अशी निश्चिती वाटणे
मी ‘महाराष्ट्र राज्य विद्युत् मंडळा’त अभियंता या पदावर नोकरी करत होतो; पण माझ्यात ४ श्रोत्यांपुढे बोलण्याचे धैर्य नव्हते. सनातन संस्थेने सांगितलेली साधना चालू केल्यावर मला सत्संग घेण्याची संधी मिळाली. सत्संगात विषय मांडतांना मला ‘माझ्या शरिरात चांगल्या शक्तीचा संचार होत आहे’, असे जाणवायचे. गुरुकृपेने हळूहळू मला सत्संग घेता येऊ लागले. तेव्हा ‘माझा सर्वांगीण विकास सनातन संस्थेमध्येच होणार आहे’, अशी माझी निश्चिती झाली. तेव्हापासून मी ‘गुरुपूजन सांगणे’ आणि गुरुपौर्णिमेशी संबंधित काही सेवा करतो. त्या सेवा श्री गुरुच माझ्याकडून करून घेतात’, असे मला वाटते.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रथम भेट हा जीवनातील ‘अमृतयोग’ !
मी फोंडा, गोवा येथील ‘सुखसागर’ येथे गेलो होतो. तेव्हा मला प.पू. गुरुमाऊलीला बघण्याची तीव्र तळमळ लागली होती. मी त्यांच्यासमोर गेलो, तो क्षण माझ्यासाठी जणू ‘अमृतयोग’ होता. ‘त्यांच्याकडून माझ्याकडे शक्ती येत आहे’, असे मला जाणवले. त्यांच्यासमोर असतांना मला एका भजनाचे बोल आठवले, ‘तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।’
४. कीर्तनशास्त्रात ‘एम्.ए.’ ही पदवी प्राप्त केल्यावर कीर्तनात प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली साधना सांगणे
मला आधीपासून भजनांची गोडी आहे. आता श्री गुरूंच्या कृपेने मला श्रोत्यांसमोर बोलता येत असल्यामुळे मी वयाच्या ५२ व्या वर्षी अकोला येथील ‘नाईकवडे कीर्तन महाविद्यालया’तून कीर्तनशास्त्रात ‘एम्.ए.’ ही पदवी प्राप्त केली ! सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे चिरंजीव पू. नंदूदादा यांच्या अनुमतीने मी कीर्तनात प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचा उपयोग करायला आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली साधना सांगायला आरंभ केला.
५. नारदीय कीर्तन
नारदीय कीर्तनात ‘मंगलाचरण, पूर्वरंग आणि उत्तररंग’, असे ३ भाग असतात. मंगलाचरणात ‘श्री गणेश, श्री सरस्वती आणि सद्गुरु यांना वंदन करून शेवटी ‘राम कृष्ण हरि ।’ असा गजर करून सद्गुरूंचे स्तवन केले जाते. त्यानंतर पूर्वरंगामध्ये मी ‘गुरुकृपायोग’ हा परात्पर गुरु डॉक्टरांनी संकलित केलेला ग्रंथ डोळ्यांसमोर ठेवून बोलतो.
५ अ. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अभंगाचे विश्लेषण करतांना ‘श्री गुरूंवरील भक्ती कशी असावी ?’ आणि ‘श्री गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ कशी असावी ?’, याचे भावपूर्ण वर्णन करणे
‘खयालों में तुम, निगाहों में तुम, जहां देखो वहां तुम-ही-तुम हो ।
दशरथनंदन सब दुखभंजन, जानकी जीवन तुम ही हो ।। १ ।।
तुम ही हो माता, पिता भी तुम हो, बंधु हो तुम, सखा भी तुम हो ।
मै हूं प्यासा चातक जैसा, अंबर, सागर तुम ही तो हो ।। २ ।।
गुरुजननी तुकामाई, येहेल गांव में तुम ही तो हो ।
अब तो कृपा बरसावो बाप्पा, गणु शरण में तुम ही तो हो ।। ३ ।।’
नंतर ‘ हरि ॐ तत्सत् ।’ आणि ‘नर्मदे हर हर हर ।’, असा गजर करून वरील अभंगाचे विश्लेषण करतो, ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा हा अभंग असून त्यांचे बालपणीचे नाव ‘गणू’ होते. ज्याला गुरुप्राप्ती करून घ्यायची आहे, त्याची तळमळ कशी असायला हवी ?’, हे या अभंगात सांगितले आहे.’ अंतिम ओळीचे विश्लेषण करतांना मी गणूने (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी) ‘गुरुप्राप्ती कशी करून घेतली ?’, याचे भावपूर्ण वर्णन करतो.
६. ८४ लक्ष योनी फिरून आल्यानंतरच मनुष्यजन्म मिळत असल्यामुळे मनुष्यजन्माचे महत्त्व फार मोठे असणे
‘जलचरयोनीत ९ लक्ष, पक्षीयोनीत १० लक्ष, कीटकयोनीत ११ लक्ष, प्राणीयोनीत २० लक्ष, वृक्षयोनीत ३० लक्ष आणि वानरयोनीत ४ लक्ष अशा ८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो’, असे सांगितले जाते. जीव जोपर्यंत शिवाशी एकरूप होत नाही, म्हणजेच त्याला मोक्ष मिळत नाही, तोपर्यंत तो जीव ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम् ।’ , म्हणजे जीव ‘पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू’ या चक्रात अखंड फिरत रहातो.’
७. जीवनातील गुरुप्राप्तीचे महत्त्व !
७ अ. मनुष्यजन्म पुष्कळ दुर्लभ असतांना मनुष्य मायेतील गोष्टी मिळवण्यातच गुंततो; मात्र ‘श्री गुरूंची कृपा प्राप्त करून घेणे’, हेच मनुष्यजन्माचे खरे ध्येय असणे : मनुष्याला कळायला लागल्यावर तो ‘मी अधिवक्ता, आधुनिक वैद्य, अभियंता किंवा अन्य काही शिक्षण घेऊन मोठा पदाधिकारी होऊन पुष्कळ पैसा मिळवणार आणि सुखात रहाणार’, असे ध्येय ठरवतो; मात्र ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे ‘केवळ गुरुकृपाच शिष्याचे परम कल्याण करते’; म्हणून ‘साधना करून गुरुप्राप्ती करून घेणे आणि श्री गुरूंची अखंड कृपा संपादन करणे’, हे मनुष्याचे खरे ध्येय असायला हवे.
७ आ. ‘मनुष्याच्या जीवनात श्री गुरूंची नितांत आवश्यकता असणे’, याविषयी श्रीकृष्ण आणि संत यांनी दिलेली उदाहरणे
७ आ १. भगवान श्रीकृष्ण : भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, ‘ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १५, श्लोक ७), म्हणजे ‘या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे.’
या बद्ध जगातील प्रत्येक जीव माझाच नित्यनूतन अंश आहे; पण षड्रिपू आणि अहंकार यांमुळे आपण बद्ध होऊन स्वस्वरूपाला विसरतो. त्या स्वस्वरूपाची ओळख श्री गुरुच आपल्याला करून देतात; म्हणूनच मनुष्य जीवनात श्री गुरूंची नितांत आवश्यकता आहे. आपण म्हणतो, ‘आई-वडिलांनी मला जन्म दिला’; पण हे अर्धसत्य आहे.
७ आ २. संत कबीर : संत कबीर म्हणतात, ‘गुरुबीन कौन बतावे बाट । बडा बिकट यमघाट ।।’
संत कबीर सांगतात, ‘भवसागर तरून जाणे’ ही पुष्कळ कठीण गोष्ट आहे. याविषयी श्री गुरूच मार्गदर्शन करू शकतात, अन्य कुणी नाही.’
७ आ ३. संत तुलसीदास : तुलसीदास कहते हैं, ‘पहले बना प्रारब्ध, फिर बना शरीर । तुलसी चिंता क्यों करे, भज ले श्री रघुबीर ।।’
संत तुलसीदास म्हणतात, ‘‘पूर्वकर्मांच्या आधारे प्रथम आपले भाग्य (प्रारब्ध) बनते. त्यानंतर देह, म्हणजे स्थूल शरीर अस्तित्वात येते. पूर्वसंचितामुळे बनलेल्या प्रारब्धात पालट होऊच शकत नाही. त्यामुळे त्याची चिंता न करता ईश्वराचे स्मरण केले पाहिजे.
८. प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म : ‘मनुष्यजन्माचे ध्येय प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि ईश्वरप्राप्ती करणे’, हे आहे. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
‘मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ।।’ – मनाचे श्लोक, श्लोक ११
अर्थ : हे मना, तू गेल्या अनेक जन्मांत जे संचित (कर्मामुळे निर्माण झालेले फळ) निर्माण केले आहेस, त्याप्रमाणे ते तुला या जन्मात भोगावे लागणार आहे.
८ अ. प्रारब्ध भोगावेच लागत असले, तरी क्रियमाण कर्म योग्य प्रकारे वापरल्यास गुरुप्राप्ती होऊन प्रारब्धभोगांची तीव्रता न्यून होऊ शकणे : कलियुगात मनुष्याच्या जीवनातील प्रारब्धाचे प्रमाण ६५ टक्के, तर क्रियमाण (आपल्या हातात असलेले कर्म)३५ टक्के आहे. त्या क्रियमाणाचा योग्य उपयोग करून ‘नवीन प्रारब्ध निर्माण होऊ नये’, याची काळजी घेतली पाहिजे. धर्माचरण, तळमळीने केलेली साधना, श्री गुरूंचा आशीर्वाद आणि त्यामुळे होणारी ईश्वरकृपा यांमुळे प्रारब्धभोग भोगणे सुसह्य होते. त्यासाठी श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधनाच करावी लागते.
‘सनातन-निर्मित ‘प्रारब्ध, संचित आणि क्रियमाणकर्म’, ‘नामसंकीर्तनयोग’ आणि ‘गुरुकृपायोग’ या ग्रंथांत वरील विषयांचे सुलभ भाषेत विस्तृत विवेचन केले आहे, ते सर्वांनी अवश्य वाचावे.
८ आ. गुरुप्राप्ती होण्यासाठी आवश्यक असलेली सात्त्विकता ! : मनुष्यामध्ये सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण असतात. सर्वसाधारण मनुष्यात २० टक्के सत्त्वगुण, ३० टक्के अहं (रजोगुण) आणि ५० टक्के स्वभावदोष (तमोगुण) असतात. साधना करतांना सत्त्वगुणाची पातळी वाढली की, प्रथम तमोगुण, नंतर हळूहळू रजोगुण न्यून व्हायला लागतो आणि सत्त्वगुण वाढतो. जिवातील सत्त्वगुण ५५ टक्के झाल्यावर त्याला गुरुप्राप्ती होते.
सनातन-निर्मित ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या ग्रंथात याविषयी विस्तृत माहिती दिली आहे.
८ इ. ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्यास मनुष्यातील सत्त्वगुण जलद गतीने वाढत असणे : गुरुप्राप्तीसाठी कुलदेवतेचे नाम अखंड घेत राहिल्यास सत्त्वगुण शीघ्रतेने गतीने वाढतो. ‘गुरुकृपायोगा’नुसार (टीप) नामजपाला ‘सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती’, या घटकांची जोड देत गेलो, तर सत्त्वगुणाची पातळी जलद गतीने वाढून शीघ्रतेने गुरुप्राप्ती होईल. श्री गुरूंनी दिलेले नाम सर्वश्रेष्ठ असून ‘सतत नामजप करणे’, हीच कलियुगातील श्रेष्ठ साधना आहे.
(टीप – ‘आरंभी ‘गुरुकृपायोगा’नुसार ‘नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती’, असे साधनेचे ५ टप्पे सांगितले होते. आता अष्टांग साधना सांगितली असून त्यात ‘स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन, अहं निर्मूलन अन् भावजागृती’, असे अजून ३ टप्पे वाढवले आहेत. – संकलक)
सत्त्वगुण वाढवण्याविषयी अधिक माहिती आपल्याला सनातन-निर्मित ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’, ‘नामसंकीर्तन आणि मंत्रयोग’ या ग्रंथांत, सनातनच्या सत्संगात किंवा ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू.सनातन.ओआर्जी’(www.Sanatan.org) या संकेतस्थळावर मिळेल.
९. सद्गुरु कसे ओळखावे ?
९ अ. ‘ज्यांच्या केवळ अस्तित्वानेही आनंद मिळतो’, ते सद्गुरु असतात’, असे सांगतांना भोंदू गुरूंविषयी सावधान करणे : ज्यांच्या केवळ अस्तित्वानेही आनंद मिळतो, तेच खरे गुरु असतात. आजकाल भोंदू गुरूंचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे खरे गुरु ओळखणे कठीण झाले आहे.
९ अ १. भोंदू गुरूंविषयी सावध करतांना संत एकनाथ महाराज सांगतात,
‘मंत्रतंत्र उपदेशिते । घरोघरीं गुरु आहेत आइते ।।
जो शिष्यासी मेळवी सद्वस्तूतें । सद्गुरु त्यांते श्रीकृष्ण मानी ।।’ – एकनाथी भागवत, अध्याय २, ओवी ४८१
अर्थ : मंत्रतंत्रांचा उपदेश करणारे गुरु घरोघर आयते असतात; पण शिष्याला जो सद्वस्तूप्रत (खर्या ईश्वराजवळ) पोचवतो, त्यालाच श्रीकृष्ण सद्गुरु म्हणतात.
९ अ २. गुरुगीतेमध्ये सद्गुरूंविषयी सांगितले आहे,
‘ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।।’ – गुरुगीता, श्लोक १११
अर्थ : ब्रह्मरूप, आनंदरूप, परमोच्च सुख देणारे, केवळ ज्ञानस्वरूप, द्वंद्वरहित, आकाशाप्रमाणे (निराकार), ‘तत्त्वमसि’ या महावाक्याचे लक्ष्य (‘ते तू आहेस’, असे वेदवाक्य ज्याला उद्देशून आहे, ते), एकच एक, नित्य, शुद्ध, स्थिर, सर्वज्ञ, सर्वसाक्षी, भावातीत, गुणातीत असलेल्या अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो.
१०. खरा ज्ञानी कोण ?
१० अ. संत कबीर म्हणतात,
‘पोथी पढपढ जग मुवा, पंडित भला न कोय ।
ढाई अक्षर प्रेम का पढे, सो पंडित होय ।।’
संत कबीर म्हणतात, ‘मोठे मोठे ग्रंथ वाचूनही ज्यांच्या मनात इतरांविषयी प्रीती नाही, त्यांचे बौद्धिक ज्ञान व्यर्थ आहे. ज्यांच्या हृदयात इतरांविषयी निरपेक्ष प्रीती आहे, तोच खरा ज्ञानी आहे.’
१० आ. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
‘शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारशील ।।
शिष्य पाहिजे केवळ । विरुक्त अनुतापे ।।’ – दासबोध, दशक ५, समास ३, ओवी २०.
अर्थ : ‘शिष्य निर्मळ, आचारशील, विरक्त असावा आणि ज्याला आपल्या स्वभावदोषांची जाणीव आहे अन् त्याविषयी ज्याला पश्चात्ताप वाटतो’, असा असावा.
११. गुरुप्राप्ती होण्यासाठी मन आतून-बाहेरून निर्मळ असावे, म्हणजेच मनुष्याने स्वतःमधील स्वभावदोष घालवणे आवश्यक असणे
एका व्यक्तीने प्रवचनात ऐकले, ‘देह आतून-बाहेरून स्वच्छ झाला, तर गुरु मिळतील.’ त्या व्यक्तीने साबण घेऊन स्वतःचे अंग पुष्कळ धुतले; पण त्याला गुरु मिळाले नाहीत. तेव्हा तो एका संतांकडे गेला आणि त्यांना सर्व सांगितले. ते संत म्हणाले, ‘तू शरीर बाहेरून स्वच्छ केलेस; पण तुझे मन अहंकाराने बरबटले आहे. त्या अहंकाराने मनुष्याचा सर्वनाश होतो; म्हणून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंकार यांच्या पैलूंचा अभ्यास करून त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केलेस, तर मन स्वच्छ होईल अन् नंतर गुरुप्राप्ती होईल.’
‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन कसे करायचे ?’, हे सनातन-निर्मित ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ या ग्रंथमालिकेत सांगितले आहे. दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधूनही याविषयी सतत मार्गदर्शन होत असते.
१२. इतर सूत्रे
मी कीर्तनातून धर्माचरणाचे महत्त्वही सांगतो, तसेच वरील साधनेच्या सूत्रांसमवेतच मी मुलांना भ्रमणभाष वापरायला देण्यातील तोटे सांगतो. त्यानंतर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’च्या स्वसंरक्षण प्रशिक्षण’ याविषयीही सांगतो. एका कीर्तनाच्या वेळी मी सनातनच्या ‘लव्ह जिहाद’ या विषयावर प्रसिद्ध केलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ५० प्रती नेल्या होत्या. या विषयानंतर त्या सर्व अंकांचे वितरण झाले.’
– ह.भ.प. गिरीष ब. कुळकर्णी, अकोला.