GlobalSpiritualityMahotsav : ‘हार्टफुलनेस’चे मार्गदर्शक कमलेशजी पटेल यांना ‘ग्लोबल अ‍ॅम्बॅसॅडर ऑफ पीस बिल्डिंग अँड फेथ’ पुरस्कार प्रदान !

  • ग्लोबल स्पिरिच्युअ‍ॅलिटी महोत्सव !

  • ‘कॉमनवेल्थ’ संघटनेच्या महासचिव पॅट्रिशिया स्कॉटलंड आणि भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संयुक्तपणे प्रदान केला पुरस्कार !

कमलेशजी पटेल यांना पुरस्कार प्रदान करतांना डावीकडून ‘कॉमनवेल्थ’ संघटनेच्या महासचिव पॅट्रिशिया स्कॉटलंड आणि भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड

(ग्लोबल अ‍ॅम्बॅसॅडर ऑफ पीस बिल्डिंग अँड फेथ म्हणजे शांतीनिर्मिती आणि श्रद्धा यांचे जागतिक दूत !)

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे चालू असलेल्या ‘ग्लोबल स्पिरिच्युअ‍ॅलिटी महोत्सवा’त (जागतिक अध्यात्म महोत्सवात) आयोजक संस्था असलेल्या ‘हार्टफुलनेस’चे मार्गदर्शक दाजी (कमलेशजी पटेल) यांचा कॉमनवेल्थ (राष्ट्रकुल) संघटनेकडून सत्कार करण्यात आला. कॉमनवेल्थच्या महासचिव पॅट्रिशिया स्कॉटलंड आणि भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दाजी यांना संयुक्तपणे ‘ग्लोबल अ‍ॅम्बॅसॅडर ऑफ पीस बिल्डिंग अँड फेथ’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. येथील ‘कान्हा शांती वनम्’ क्षेत्रात ४ दिवसीय महोत्सव पार पडला. याच्या शेवटच्या दिवशी १७ मार्चला हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला.

कमलेशजी पटेल यांनी सर्वांना आध्यात्मिक सौख्य लाभण्यासाठी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे ! – पॅट्रिशिया स्कॉटलंड, ‘कॉमनवेल्थ’ संघटना

या वेळी पॅट्रिशिया स्कॉटलंड म्हणाल्या की, कमलेशजी पटेल (दाजी) यांची दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि अथक परिश्रम यांमुळे एकेकाळी असलेला दुष्काळसदृश प्रदेश आज हिरवागार झाला आहे. निसर्गाशी केलेली ही मैत्री महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रकुल हे ५६ देशांचे आणि अडीच अब्ज लोकांचे कुटुंब आहे. शांतता, सामंजस्य आणि परस्पर आदर यांविषयी आमची सामायिक भावना दाजी यांनी सर्वांसमोर ठेवली आहे. त्यांचे ज्ञान आणि करुणा, तसेच सर्वांच्या आध्यात्मिक सौख्यासाठीचे प्रयत्न हे वाखाणण्याजोगे आहेत.

सर्व नागरी पुरस्कार हे वस्तूनिष्ठ निकषांवर आधारित ! – जगदीप धनखड, उपराष्ट्रपती

एक काळ असा होता, जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार देण्यासाठीचे निकष हे अतार्किक होते. काळ पालटला आहे. आज सर्व नागरी पुरस्कार हे वस्तूनिष्ठ निकषांवर आधारित असतात. दाजी यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारही त्यामुळेच दिला गेला; परंतु या पुरस्कारापेक्षाही त्यांना लक्षावधी लोक ‘दाजी’ म्हणतात, हा सर्वांत मोठा पुरस्कार आहे !

हा पुरस्कार माझ्या संस्थेचा ! – कमलेशजी पटेल(दाजी)

या वेळी दाजी म्हणाले की, मी आज मन आणि बुद्धी यांनी कृतज्ञता व्यक्त करतो. हा पुरस्कार माझ्या संस्थेचा आहे, माझा नाही. आता आमच्यासमवेत ३०० आध्यात्मिक संस्थांची शक्ती आहे. आम्ही सर्वजण एकोप्याने प्रेम, आदर, विश्‍वास आणि सन्मान यांनी एकत्र आलो.