‘मला डेंग्यू झाल्यामुळे मी रुग्णालयात भरती झालो होतो. रुग्णालयात असतांना माझा नामजप नियमित होत असे. त्या वेळी मला झालेला त्रास आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने स्थिर रहाता येणे, यांविषयी येथे दिले आहे.
१. रुग्णालयातून घरी जाण्याच्या आदल्या रात्री ‘कुणीतरी सूक्ष्मातून आक्रमण करत आहे’, असे जाणवणे
माझ्यावर रुग्णालयात ४ – ५ दिवस औषधोपचार झाल्यावर घरी जाण्याच्या आदल्या रात्री अनुमाने ९.३० वाजता मी जेवून अंथरुणावर पहुडलो होतो. काही वेळानंतर ‘माझ्यावर कुणीतरी सूक्ष्मातून आक्रमण करत आहे’, असे मला जाणवले. मी अंथरुणावर पहडून नामजप करू लागलो. माझ्यावर सूक्ष्मातून होणार्या आक्रमणाची तीव्रता वाढू लागल्यावर मी अंथरुणावर बसून नामजप केला. त्या वेळी मला खोलीत पुष्कळ दाब जाणवत होता.
२. व्यक्तीने दीर्घ श्वास घेतांना आणि गतीने उच्छ्वास सोडतांना जसा आवाज होतो, तसा आवाज खोलीत ऐकू येणे आणि त्याचे भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रण करणे
रुग्णालयाच्या वरच्या माळ्यावर ५ खोल्या होत्या; मात्र त्या सर्व रिकाम्या होत्या. आमच्या खोलीत आम्ही (मी आणि माझा मोठा मुलगा (श्री. आशिष)) झोपलो होतो. आशिष माझ्यापासून १० फूट अंतरावर झोपला होता. मी नामजप आणि प्रार्थना करत असल्याने देवाने मला भीतीदायक प्रसंगातही अतिशय स्थिर ठेवले.
सूक्ष्मातील लढा बराच वेळ चालू होता. नंतर मला खोलीत आवाज ऐकू येऊ लागला. व्यक्तीने दीर्घ श्वास घेतांना आणि गतीने उच्छ्वास सोडतांना जसा आवाज होतो, तसा तो आवाज होता. तो आवाज बाहेरून येत नव्हता. मी निश्चिती करण्यासाठी खोलीचे दार उघडून पाहिले. नंतर मी मुलाजवळ जाऊन कानोसा घेतला. ‘मला भास तर होत नाही ना ?’, याची निश्चिती करण्यासाठी मी भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रण करू लागलो. काही वेळाने आवाज बंद झाला आणि खोलीतील दाबही न्यून झाला. त्यानंतर मला बर्याच वेळानंतर झोप लागली.
३. सकाळी भ्रमणभाषवर केलेले ध्वनीमुद्रण ऐकणे आणि ‘ध्वनीमुद्रित केलेला आवाज खरा आहे’, हे लक्षात येणे अन् साधकाच्या मुलाने ‘‘स्वप्नात साधकाच्या शेजारी पांढर्या रंगाची कफनी घातलेली एक व्यक्ती उभी आहे’, असे दिसले’’, असे सांगणे
मी दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर अनुमाने १० वाजता मला रात्रीच्या प्रसंगाची आठवण झाली. मी भ्रमणभाषवर केलेले ध्वनीमुद्रण ऐकले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘तो भास नसून खरोखर आवाज येत होता.’ भ्रमणभाषवर तेव्हा रात्री १२ वाजताची वेळ दाखवली होती. मी मुलाला हा प्रसंग सांगायच्या आधी त्याने सांगितले, ‘‘मला स्वप्नात दिसले, ‘तुमच्या शेजारी कोपर्यात पांढर्या रंगाची कफनी घातलेली एक व्यक्ती उभी आहे.’’
या प्रसंगात मला भीती वाटली नाही. मला स्थिर ठेवून आणि बळ देऊन वाईट शक्तीशी लढायला शिकवल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवंत यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ५५ वर्षे), फोंडा, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |