हिंदु एकता आंदोलनाची चेतावणी
मशिदीला विदेशातून ७५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य !
सांगली, १४ मार्च (वार्ता.) – सांगली शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असणार्या बिसूर या गावातील एका छोट्या मशिदीचे डागडुजी करण्याचे खोटे कारण सांगून अनधिकृतपणे ७५ लाख रुपये व्यय करून मोठी मशीद बांधण्यात आली आहे. या मशिदीला विदेशी लोकांनी आर्थिक साहाय्य केले असून मशिदीला विदेशी लोकांचे नाव देण्यात आले आहे. या मशिदीमध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते ? हा संशयाचा विषय आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अनधिकृतपणे मशीद बांधणार्या आणि बाहेरून येणार्या लोकांवर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु एकता आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ? – संपादक)
बिसूर या गावातील हिंदु-मुसलमान लोकांनी हिंदु एकता आंदोलन संघटनेकडे गावातील अनधिकृत ट्रस्ट आणि मशीद या संदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना हिंदु एकता आंदोलन संघटनेच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या वेळी सांगली शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण, मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोठखिंडे, सांगलीवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, खनभाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव, बिसूर येथील अल्लाउद्दीन मुजावर, दिनकर देशमुख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, बिसूर गावामध्ये हजरत पिर वाली बाहाउद्दीन दर्गा आहे. ‘मुस्लिम दर्गाह मज्जिद कमिटी सांगली रजि. नं. बी./६ कोल्हापूर’ ही संस्था वर्ष १९५२ मध्ये वक्फ बोर्ड छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्ग करण्यात आली आहे. येथील सर्व धार्मिक कार्य बिसूर येथील मुजावर समाजाकडे आहे. संस्थेची मालमत्ता नोंद प्रमाणे २ सहस्र ६०० चौ.मी. आहे. याच जागेवर मुसलमान समाजासाठी नमाज पडण्यासाठी छोटीशी मशीद होती; परंतु गावातील आणि काही बाहेरच्या मुसलमान लोकांनी मिळून मुस्लिम सुन्नत तबलीग जमात नोंदणी क्रमांक ६ सहस्र ३८३ सांगली १९९८ मध्ये त्याच जागेमध्ये अनधिकृत संस्था नोंदणी करून दर्गाह मशीद जामा मशिदीमध्ये वर्ग केली.
‘येथील छोट्याशा मशीदची डागडुजी करायची आहे’, असे कारण सांगून ग्रामपंचायतीकडून अनुमती घेऊन त्या जागेवर ७५ लाख रुपये व्यय करून मोठी मशीद बांधण्यात आली आहे. ७५ लाख रुपये एवढी मोठी रक्कम या छोट्याशा गावामधून जमा करणे अशक्य आहे. मग हा पैसा आला कुठून ? त्या मशीदला विदेशी लोकांचे नाव देण्यात आले आहे. या मशिदीमध्ये बाहेरचे लोक वास्तव्यास येत असून मशिदीमध्ये एका भागात काच लावण्यात आली आहे. जेणेकरून आत काय शिकवले जात आहे ? याचा आवाज बाहेर येऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे. मग या मशिदीमध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जात आहे ? हा संशयाचा विषय आहे. मशिदीचे उद्घाटन करतांना केलेल्या भाषणातील एका व्यक्तीने ‘मी २७ मशिदी बांधून दिल्या आहेत.’ जर २७ वी मशीद बिसूर येथे बांधली आहे, तर बाकीच्या २६ मशिदी कोठे बांधल्या आहेत ? एवढ्या मोठ्या प्रमाणात विदेशातून निधी आणून भारतात मशीद बांधण्याचा हेतू काय आहे ? या सर्व गोष्टींची सखोल चौकशी करावी, अनधिकृत ट्रस्ट स्थापन करून अनधिकृत मशीद बांधणार्या सर्व लोकांवर कारवाई करावी, तसेच बाहेरून वास्तव्यासाठी येणारे लोक आणि पैसा यांवर बंदी घालावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.