Global Spirituality Mahotsav : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाला प्रारंभ !

जागतिक अध्यात्म महोत्सव

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि ‘हार्टफुलनेस’  ही आध्यात्मिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चेगुर येथील शांती वनम् येथे ४ दिवसीय जागतिक अध्यात्म महोत्सवाला १४ मार्चपासून प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या माध्यमातून ३०० आध्यात्मिक संस्था आणि ७५ सहस्रांहून अधिक प्रतिनिधी जागतिक समरसता प्रकट करण्याच्या समान ध्येयाने एकत्र आले आहेत. या अध्यात्म परिषदेत जगभरातून अनुमाने १० लाख लोक ऑनलाईन सहभागी होणार आहेत.

भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड हे अनुक्रमे १५ आणि १६ मार्च या दिवशी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

‘हार्टफुलनेस’चे मार्गदर्शक प.पू. चिन्नाजीयर स्वामीजी आणि दाजी  (कमलेशजी पटेल), श्री रामचंद्र मिशनचे अध्यक्ष स्वामी बोधमयानंदजी, जगभरातील सर्व प्रमुख धर्मांतील आध्यात्मिक गुरु, संत अन् धर्मगुरु या महोत्सवाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.