२९ फेब्रुवारी २०२४ च्या दैनिक ‘लोकसत्ता’मधील ‘बाबांची बनवेगिरी’ हा लेख वाचला. १० जुलै २०२२ च्या ‘द हिंदू’ या दैनिकात ‘बाबा रामदेव यांच्या पतंजलि उत्पादनांचे ‘ॲलोपॅथीकडून होणारा अपप्रचार : स्वतःला आणि देशाला ‘फार्मसी’ (औषध विक्रेत्याचे दुकान) अन् वैद्यकीय क्षेत्रातून बाहेर होणार्या अपप्रचारापासून वाचवा’, या मथळ्याखाली अर्धा पानभर विज्ञापन प्रसिद्ध झाले होते. या विज्ञापनाचा संदर्भ देत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने पतंजलीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ‘रिट याचिका’ प्रविष्ट केली होती. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने नोंद घेत ‘पतंजलि आयुर्वेद’ला पुन्हा एकदा खडसावले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावून कंपनीला तिचे म्हणणे मांडण्यासाठी ३ आठवड्यांची मुदतसुद्धा दिलेली आहे. त्यामुळे ३ आठवड्यांनंतर पतंजलि आयुर्वेद काय बाजू वा म्हणणे मांडते ? हे पहाणेही तितकेच आवश्यक आहे, असे वाटते. अर्थात् हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आणि पतंजलीच्या आयुर्वेदाच्या विविध औषधांचे सकारात्मक प्रतिसाद अनुभवलेले किती तरी नागरिकसुद्धा समाजाचा भाग असल्याने बाबा रामदेव यांना थेट आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याची आणि त्यांच्या औषधांना बोगस (खोटे) ठरवण्याची लेखकांनी केलेली घाई विवेकबुद्धीला न पटणारी आहे.
१. आध्यात्मिक मार्गदर्शनातून समाज सन्मार्गाकडे वळत असतांना अंधश्रद्धा म्हणून का पहायचे ?
याच लेखावर आपले मत मांडणारे ‘अशा बर्याच बाबांचे स्तोम’, या मथळ्याखाली १ मार्चला श्रीकांत पटवर्धन (कांदीवली, मुंबई) यांचे पत्र वाचनात आले. या पत्राला त्यांनी उपरोक्त लेखाचा संदर्भ दिला असला, तरी पत्राच्या माध्यमातून त्यांनी थेट अध्यात्मावरच निशाणा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजमितीला समाजाचे नैतिक अध:पतन होत असतांना आध्यात्मिक मार्गदर्शनातून समाजाला सन्मार्गाला लावण्याचे, व्यसनमुक्तीकडे नेण्याचे आणि नैतिकतेचे महत्त्व बिंबवण्याचे कार्य अध्यात्मातील काही अधिकारी मंडळी करत आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेचा वारसा चालवणार्या या मंडळींकडे पत्रलेखक अंधश्रद्धेच्या चष्म्यातून का पहात आहेत ? ज्या प.पू. आसारामबापूजींचा त्यांनी उल्लेख केला आहे, त्यांच्या नावासमोर कोणती उपाधी लावावी ? हे ठरवणारे आपण कोण आहोत ? ते आज तुरुंगात आहेत म्हणून त्यांनी त्यांच्या संप्रदायाच्या माध्यमातून इतकी वर्षे केलेली समाजसेवा दुर्लक्षून कशी चालेल ?
२. सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना अपकीर्त करणे कितपत योग्य ?
ज्या ‘सनातन’विषयी रामनाथी (गोवा) येथील बाबांच्या चमत्कारांविषयी आणि त्यांच्या प्रकाशनात ईश्वरी दाव्यांचा संदर्भ श्रीकांत पटवर्धन देत आहेत, त्यांना जवळून अनुभवण्याची संधी मला मिळाली आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (जे भगवी वस्त्रेही घालत नाहीत आणि ते स्वतःला बुवा किंवा बाबाही म्हणवून घेत नाहीत) जे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या खोलीच्या बाहेरही येत नाहीत.
पूर्वायुष्यात ‘आंतरराष्ट्रीय संमोहन उपचार तज्ञ’ म्हणून ख्याती मिळवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वतः विज्ञाननिष्ठ आहेत. याच विज्ञाननिष्ठतेच्या बळावर त्यांनी अध्यात्मातील विविध सूत्रे शास्त्रीय परिभाषेत मांडली. अध्यात्म शिकवण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळेच मोठमोठे डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभियंते, अधिवक्ते त्यांच्या अभ्यासवर्गांना येऊन स्वतः साधना करू लागले. दैनंदिन जीवनातील प्रत्येक आचरणात अध्यात्म कसे लपले आहे ? हे त्यांची पुस्तके वाचल्यावर कळते. चमत्कारांचा दावा करत भोळ्या भाबड्या लोकांना फसवणार्या भोंदूंविषयी त्यांनी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधून वेळोवेळी आसूड ओढले आहेत. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्याने कृती (साधना) केल्यावर येणार्या अनुभूती (ज्यामध्ये चमत्कारांचा दावा नसतो) त्यांच्या पुस्तकांतून वाचायला मिळतात.
महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आहे, या अंतर्गत चमत्कार करणे आणि चमत्कारांचा दावा करणे, हा अजामीनपात्र फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. असे असले, तरी लेखकाने विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून एका सेवाभावी संस्थेला अपकीर्त करू नये.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई. (२.३.२०२४)